राज्य अजिंक्यपद स्पध्रेला मुकणाऱ्या खेळाडूंसाठी संघटनेचे धोरण

मुंबई : प्रो कबड्डी लीग चालू असताना महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनने सिन्नर येथे राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेची योजना आखल्यामुळे कबड्डीवर्तुळात आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. कारण महाराष्ट्रातील मातब्बर खेळाडू राज्य अजिंक्यपद स्पध्रेला मुकणार आहेत. परंतु प्रो कबड्डीत खेळणाऱ्या राज्यातील खेळाडूंच्या कामगिरीवर निवड समिती लक्ष ठेवून आहे. त्यातील कामगिरीआधारे त्यांना महाराष्ट्राच्या संघात स्थान दिले जाईल, असे महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनने स्पष्ट केले आहे.

सिन्नरमधील आडवा फाटा मैदान येथे ३१ ऑक्टोबर ते ४ नोव्हेंबर या कालावधीत ६६व्या राज्य अजिंक्यपद स्पध्रेचे आयोजन करण्यात आले. मात्र याचवेळी प्रो कबड्डीचा पाटणा आणि उत्तर प्रदेशचा टप्पा चालू असेल. त्यामुळे प्रो कबड्डीमधील विविध संघांकडून खेळणारे महाराष्ट्राचे खेळाडू सहभागी होऊ शकणार नाहीत. त्यामुळे या खेळाडूंसाठी कोणती निवड प्रक्रिया वापरली जाणार ही चर्चा ऐरणीवर होती.

रिशांक देवाडिगा, विशाल माने, श्रीकांत जाधव, सिद्धार्थ देसाई, काशिलिंग आडके, ऋतुराज कोरवी, विकास काळे, तुषार पाटील, विराज लांडगे, सचिन शिंगार्डे, बाजीराव होडगे, आदिनाथ गवळी, संकेत चव्हाण, शुभम पालकर, अक्षय जाधव, गिरीश ईर्नाक आणि आनंद पाटील हे खेळाडू प्रो कबड्डीत विविध संघांकडून आपली छाप पाडत आहेत. गतवर्षी महाराष्ट्राला तब्बल ११ वर्षांनंतर राष्ट्रीय विजेतेपद मिळवून देणाऱ्या खेळाडूंचा यात समावेश आहे.

‘‘राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पध्रेतून महाराष्ट्राच्या पुरुष व महिला संघांच्या निवडीसाठी प्रत्येकी २० खेळाडूंचा संभाव्य संघ निवड केला जाणार होता. परंतु राज्य अजिंक्यपद आणि प्रो कबड्डी यातील कामगिरीआधारे आम्ही पुरुषांच्या संभाव्य संघात २०हून अधिक खेळाडूंची विशेष शिबिरासाठी निवड करणार आहोत. या शिबिरानंतर अंतिम संघ निश्चित करण्यात येईल,’’ अशी माहिती राज्य कबड्डी संघटनेचे सरकार्यवाह अ‍ॅड. आस्वाद पाटील यांनी दिली.