पितृत्वाच्या रजेनंतर भारताचा कर्णधार विराट कोहली तसेच वेगवान गोलंदाज इशांत शर्मा दुखापतीनंतर भारतीय संघात पुनरागमन करणार आहे. इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी भारतीय संघाची निवड मंगळवारी केली जाणार आहे.

वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमरा आणि फिरकीपटू रवीचंद्रन अश्विन यांच्या तंदुरुस्तीकडे सर्वाचे लक्ष लागले आहे. पोटाच्या दुखापतीमुळे बुमरा तर पाठीच्या दुखापतीमुळे अश्विन ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्यात खेळू शकले नाही. मात्र इंग्लंडविरुद्धचा पहिला कसोटी सामना ५ फेब्रुवारी रोजी चेन्नई येथे होणार असून तोपर्यंत दोघांनाही दुखापतीतून सावरण्यासाठी पुरेसा वेळ मिळणार आहे. त्यामुळे या दोघांचीही संघनिवड निश्चित मानली जात आहे.

जायबंदी झालेले मोहम्मद शमी, रवींद्र जडेजा, उमेश यादव आणि हनुमा विहारी हे निवडीसाठी उपलब्ध नसतील. त्यामुळे चेतन शर्मा यांच्या अध्यक्षतेखालील नवीन निवड समितीसमोर तंदुरुस्त असलेल्या खेळाडूंना निवडण्याचे आव्हान असेल.

मांडीचे स्नायू ताणले गेल्यामुळे इशांत ऑस्ट्रेलिया दौऱ्याला मुकला होता. त्याने सय्यद मुश्ताक अली क्रिकेट स्पर्धेत पुनरागमन केले. त्यामुळे इशांतसह, बुमरा, मोहम्मद सिराज तसेच शार्दूल ठाकूर आणि टी. नटराजन या वेगवान गोलंदाजांना संघात संधी मिळणार आहे. जडेजाच्या अनुपस्थितीत फिरकी गोलंदाजीची जबाबदारी अश्विन आणि वॉशिंग्टन सुंदर यांच्यावर असेल. कुलदीप यादवला पर्यायी फिरकीपटू म्हणून संधी मिळण्याची शक्यता आहे.

सलामीवीर पृथ्वी शॉ याला संघातून डच्चू मिळणार आहे. मयांक अगरवाल आणि लोकेश राहुल यांच्यापैकी कुणाला संधी मिळते, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.