भारतात क्रिकेटपटूंची कमतरता नाही, प्रत्येक आई-वडील आपल्या मुलाला क्रिकेटपटू बनवण्याचं स्वप्न पाहतात. मुळ भारतीय वंशाचे असून दुसऱ्या देशांकडून क्रिकेट खेळणारे काही खेळाडू आपण पाहिले आहेत. नासीर हुसेन, गुरिंदर संधू, ईश सोढी या खेळाडूंच्या यादीत आता पंजाबच्या सिमरनजीत सिंह या खेळाडूचं नाव जोडलं जाणार आहे.

मोहाली शहरात राहणाऱ्या सिमरनजीतने यंदा आयर्लंडकडून खेळताना न्यूझीलंड संघाविरुद्ध आंतराष्ट्रीय सामन्यात पदार्पण केलं. याव्यतिरीक्त वेस्ट इंडिजविरुद्ध होणाऱ्या सामन्यासाठीही सिमरनजीतचा आयर्लंडच्या संघात समावेश करण्यात आला आहे. काही महिन्यांपूर्वी आयसीसीने आयर्लंडला कसोटी क्रिकेट खेळण्याचा दर्जा दिला. त्यामुळे कसोटी क्रिकेट खेळण्याचं आपलं स्वप्न पूर्ण करण्याचे वेध सिमरनजीतला लागले आहेत.

‘टाईम्स ऑफ इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीत सिमरनजीतने आपल्याला पंजाबकडून खेळताना पुरेशी संधी मिळाली नसल्याची खंत व्यक्त केली. ज्युनिअर लेवलवर खेळताना त्याने फलंदाजी, गोलंदाजी या दोन्ही बाबतीत आपली गुणवत्ता सिद्ध केली. मात्र ज्यावेळी १९ वर्षाखालील संघाची निवड करण्याची वेळ आली त्यावेळी आपल्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आल्याचं तो म्हणाला. १४ आणि १७ वर्षाखालील संघाकडून खेळताना त्याने पंजाबकडून चांगला खेळ केला. २००४ साली १७ वर्षाखालील संघातून खेळताना त्याने एका हंगामात ७२५ धावा केल्या. २००१ साली विजयवाडात झालेल्या राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धेत त्याला सर्वोत्कृष्ट खेळाडूचं बक्षिसही मिळालं. मात्र १९ वर्षाखालील संघात निवडीच्या वेळी आपल्याला हेतूपुरस्सर डावललं गेल्याचं तो म्हणाला.

“माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबियांठी हा अतिशय कठीण काळ होता. भारतासाठी खेळण्याचं मी बघितलेलं स्वप्न पूर्ण होणार नाही, हे मी त्या वेळीच समजून गेलो होतो. यानंतर मी २००५ साली आयर्लंडला जाऊन हॉटेल मॅनेजमेंटमध्ये करिअर करण्याचं ठरवलं. पण क्रिकेटची ओढ काही केल्या स्वस्थ बसू देईना. यानंतर माझ्या काही मित्रांच्या मदतीने मी काम सांभाळून क्रिकेट खेळायला लागलो. २००८ साली मी डबलिन शहरात एका स्थानिक क्लबकडून क्रिकेट खेळायला लागलो.” आयर्लंडमधल्या सुरुवातीच्या दिवसांबद्दल सिमरनजीतने माहिती दिली.

काळानुरुप मला आयर्लंड क्रिकेटमधे खेळण्याची संधी मिळाली. केवीन ओब्रायन, जॉन अँडरसन, जॉर्ज डॉक्रेल या खेळाडूंनी मला काही महत्वाच्या टिप्स दिल्या. विशेषकरुन ओब्रायनने मला माझ्या खेळात आक्रमकता आणायला सांगितली. ज्याचा पुढच्या काळात मला चांगलाच फायदा झाला. सध्या सिमरनजीत आयर्लंडचं नागरिकत्व मिळवण्याच्या खटपटीत आहे. लवकरच आयर्लंडकडून त्याला कसोटी सामना खेळायचा आहे. मात्र योग्य वेळी भारताकडून खेळण्याची संधी न मिळाल्याचं दुःख सिमरनजीतच्या मनात कायम आहे.