पवन नेगीला संधी; रिशी धवन, गुरकीरत सिंग मान आणि उमेश यादवला डच्चू
ऑस्ट्रेलिया दौऱ्यात धावांची टांकसाळ उघडणाऱ्या विराट कोहलीला श्रीलंकेविरुद्धच्या ट्वेन्टी-२० मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली आहे. कसोटी, एकदिवसीय आणि ट्वेन्टी-२० अशा तिन्ही प्रकारांत सातत्याने खेळणाऱ्या कोहलीला ट्वेन्टी-२० विश्वचषकापूर्वी पुरेशी विश्रांती मिळावी यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. अष्टपैलू पवन नेगीला संघात समाविष्ट करण्यात आले आहे.
ऑक्टोबर ते जानेवारी या कालावधीत कोहली ४ कसोटी, १० एकदिवसीय आणि ५ ट्वेन्टी-२० लढतींत सहभागी झाला. सातत्यपूर्ण प्रदर्शनाच्या जोरावर कोहलीने भारतीय संघाच्या विजयात निर्णायक भूमिका बजावली. दरम्यान इंडियन प्रीमिअर लीग स्पर्धेत, चेन्नई सुपर किंग्सकडून खेळलेल्या पवन नेगीला संघात समाविष्ट करण्यात आले आहे. नुकत्याच झालेल्या मुश्ताक अली आणि देवधर चषक स्पर्धेत नेगीने चांगली कामगिरी केली होती. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पाचव्या एकदिवसीय सामन्यात शतकी खेळी करणाऱ्या मनीष पांडेलाही संघात स्थान देण्यात आले आहे.
ऑस्ट्रेलिया दौऱ्यात समाधानकारक कामगिरी करू न शकलेल्या रिशी धवन, गुरकीरत सिंग मान आणि उमेश यादव यांना संघातून वगळण्यात आले आहे. दुखापतीतून सावरलेल्या भुवनेश्वर कुमारचे पुनरागमन झाले आहे. भारतीय संघ श्रीलंकेविरुद्ध पुणे (९ फेब्रुवारी), रांची (१२ फेब्रुवारी) आणि विशाखापट्टणम (१४ फेब्रुवारी) येथे सामने खेळणार आहे.

पुरुष संघ : महेंद्रसिंग धोनी (कर्णधार), रोहित शर्मा, शिखर धवन, अजिंक्य रहाणे, मनीष पांडे, सुरेश रैना, युवराज सिंग, हार्दिक पंडय़ा, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, जसप्रीत बुमराह, आशीष नेहरा, हरभजन सिंग, भुवनेश्वर कुमार, पवन नेगी.

महिला संघ (ट्वेन्टी-२० करिता): मिताली राज (कर्णधार), स्मृती मंधाना, वेदा कृष्णमूर्ती, हरमनप्रीत कौर, अनुजा पाटील, झूलन गोस्वामी, शिखा पांडे, राजेश्वरी गायकवाड, सुषमा वर्मा, पूनम यादव, व्ही.आर. वनिता, स्नेह राणा, थिरुषकामिनी एम.डी., एकता बिश्त, निरंजना नागराजन.
महिला संघ (एकदिवसीयकरिता) : मिताली राज (कर्णधार), स्मृती मंधाना, वेदा कृष्णमूर्ती, हरमनप्रीत कौर, थिरुषकामिनी एमडी, झूलन गोस्वामी, शिखा पांडे, राजेश्वरी गायकवाड, सुषमा वर्मा, पूनम यादव, दीप्ती शर्मा, पूनम राऊत, आर. कल्पना, निरंजना नागराजन, प्रीती बोस.

विराट कोहली क्रमवारीत अव्वल
दुबई : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ट्वेन्टी-२० मालिकेत धावांचा पाऊस पाडणाऱ्या विराट कोहलीने आयसीसी ट्वेन्टी-२० क्रमवारीत अव्वल स्थान पटकावले आहे. त्याच्या अफलातून फटकेबाजीच्या जोरावर भारताने ही मालिका ३-० अशी जिंकत निर्भेळ यश मिळवले. एकाच मालिकेत तीन अर्धशतके फटकावणाऱ्या विराटने (८९२) अव्वल स्थानावर विराजमान असलेल्या ऑस्ट्रेलियाच्या आरोन फिंचला (८६८) मागे टाकले.
ट्वेन्टी-२० मालिकेत कोहलीने अनुक्रमे नाबाद ९०, नाबाद ५९ आणि ५० धावांची खेळी केली. कोहलीने आपल्या खात्यात ४७ गुणांची भर घातली. भारताच्या सुरेश रैनानेही तीन स्थानांची झेप घेत १३वे स्थान गाठले.