भारतीय क्रिकेट संघाच्या निवड समितीने २०१२ सालीच महेंद्रसिंग धोनीला कर्णधारपदावरून दूर सारून विराट कोहलीला कर्णधार करायचे ठरविले होते. केवळ बीसीसीआयचे तत्कालीन अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांच्या विरोधामुळे निवड समितीचा तो निर्णय प्रत्यक्षात येऊ शकला नव्हता, असा गौफ्यस्फोट निवड समितीचे माजी सदस्य राजा वेंकट यांनी केला. राजा वेंकट हे २००८-२०१२ या काळात पूर्व विभागाच्या राष्ट्रीय निवड समितीचे सदस्य होते. २०१२ मध्ये महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाच्या संघभावनेवर विपरीत परिणाम झाला होता. संघातील अंतर्गत ढवळाढवळीमुळे त्यावेळी संघाच्या नेतृत्वात बदल करण्याची मागणी होत होती, असेदेखील राजा वेंकट यांनी सांगितले.
सध्या भारतीय संघ बांगलादेश दौऱ्यावर असून विराट कोहली पहिल्यांदाच भारतीय कसोटी संघाचे पुर्णवेळ कर्णधारपद सांभाळत आहे. या पार्श्वभूमीवर वेंकट राजू यांनी २०१२ सालच्या टीम इंडियासंदर्भातील अनेक घटनांवर प्रकाश टाकला. त्यावेळी भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर होता. भारताने चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तीन कसोटी सामने गमावले होते. त्यामुळे धोनीकडे असलेली नेतृत्वाची धुरा दुसऱ्या खेळाडुकडे सोपवावी, यावर निवड समितीचे एकमत झाल्याचे राजा वेंकट यांनी एका बंगाली टॅब्लॉईड वृत्तपत्रात लिहलेल्या स्तंभात म्हटले आहे.
उत्तर आणि मध्य विभागाच्या राष्ट्रीय निवड समितीचे सदस्य असणाऱ्या मोहिंदर अमरनाथ आणि नरेंद्र हिरवानी यांच्यासह आम्ही एकमताने भारतीय संघासाठी नवा कर्णधार निवडण्याचे ठरविले होते. आमच्या मते कर्णधार म्हणून धोनीचा काळ सरला होता आणि विराट कोहलीने संघाची सूत्रे हाती घेण्याची वेळ आली होती. मात्र, बीसीसीआय अध्यक्षांच्या परवानगीशिवाय आम्ही परदेश दौऱ्यासाठी परस्पर भारतीय संघाची घोषणा करू शकत नव्हतो. परंतु, त्यावेळी श्रीनिवासान यांनी आम्हाला धोनीकडून कर्णधारपद काढून घेण्याची परवानगी दिली नव्हती, असेही राजा वेंकट यांनी सांगितले.