भारतीय संघाचे माजी यष्टीरक्षक फारुख इंजिनीअर यांनी, एम.एस.के. प्रसाद यांच्या निवड समितीला टिकेचं लक्ष्य केलं आहे. प्रसाद आणि त्यांचे सहकारी म्हणजे Mickey Mouse Selection Committee असून ही लोकं फक्त अनुष्का शर्माच्या गरजा पूर्ण करण्यामध्ये मग्शुल असतात. भारताचे माजी क्रिकेटपटू दिलीप वेंगसरकर यांच्या पुणे येथील क्रिकेट अकादमीला इंजिनीअर यांनी भेट दिली. यावेळी टाइम्स ऑफ इंडिया वृत्तपत्राशी ते बोलत होते.

“अनुष्का शर्माला कपातून चहा देण्याऐवजी यांनी काहीही काम केलं नाही. इंग्लंडमध्ये झालेल्या विश्वचषक स्पर्धेत असंच चित्र होतं. मला हेच कळत नाही, की लोकं निवड समितीवर निवडून येण्यासाठी पात्र कशी ठरली? यांच्यापैकी किती लोकांनी किमान १०-१२ कसोटी सामने खेळले आहेत? त्यांच्यापैकी एकाला तर मी ओळखतही नव्हतो. विश्वचषकादरम्यान हा माणूस कोण आहे? असं विचारल्यावर मला तो निवड समितीचा सदस्य असल्याचं कळलं.” इंजिनीअर यांनी आपलं परखड मत मांडलं.

भारताच्या सध्याच्या निवड समितीपैकी एम.एस.के. प्रसाद यांनी ६ कसोटी आणि १७ वन-डे सामने खेळले आहेत. याव्यतिरीक्त देवांग गांधी (४ कसोटी, ३ वन-डे), शरणदीप सिंह (३ कसोटी, ५ वन-डे), जतिन परांजपे (४ वन-डे) आणि गगन खोडा (२ वन-डे) सामने खेळले आहेत. यावेळी बोलत असताना इंजिनीअर यांनी दिलीप वेंगसरकर यांच्यासारखी अनुभवी माणसं निवड समितीवर असणं गरजेचं असल्याचं म्हटलं. इंजिनीअर यांनी १९६१ ते १९७६ या काळात ४६ कसोटी आणि ५ वन-डे सामन्यांमध्ये भारताचं प्रतिनिधीत्व केलं आहे.