ऑस्ट्रेलिया दौऱ्यात दिवस-रात्र कसोटी सामने खेळण्यासाठी नकार देणाऱ्या भारतीय क्रिकेट संघावर, ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू मार्क वॉ चांगलाच नाराज झालेला आहे. अॅडलेड कसोटी दिवस-रात्र पद्धतीत खेळायला नकार देऊन, टीम इंडियाने आपला स्वार्थीपणा दाखवला असल्याचं मार्क वॉ म्हणाला आहे. दिवस-रात्र कसोटी सामना खेळण्यावरुन क्रिकेट ऑस्ट्रेलिया आणि बीसीसीआयमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये चांगलीच जुंपली होती. मात्र बीसीसीआयने घेतलेल्या कडक पवित्र्यामुळे ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाला माघार घ्यावी लागली.

अवश्य वाचा – ऑस्ट्रेलिया क्रिकेट निवड समितीला मार्क वॉची सोडचिठ्ठी

“सध्या कसोटी क्रिकेटची अवस्था आपण सर्व जाणतो आहोत. टी-२० च्या जमान्यात कसोटी क्रिकेट टिकवायचं असेल तर दिवस-रात्र कसोटी सामने खेळण्याशिवाय पर्याय नाही. मात्र भारतीय संघाने या प्रस्तावाला नकार देत आपला स्वार्थीपणा दाखवून दिला आहे. Big Sports Breakfast या रेडीयो चॅनलला दिलेल्या मुलाखतीत मार्क वॉने बीसीसीआयवर टीकेची झोड उठवली आहे. सध्या भारत, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड या देशांमुळे कसोटी क्रिकेट जिवंत आहे. मात्र ही परिस्थिती सुधारण्यासाठी आपल्याला नवीन बदल आत्मसात करणं गरजेचं आहे. दिवस-रात्र कसोटी सामने हे कसोटी क्रिकेटला पुन्हा एकदा पुनरुज्जीवीत करु शकतात, असंही मार्क वॉ म्हणाला आहे.

अवश्य वाचा – भारत दिवस-रात्र कसोटी सामना खेळणार नाही, बीसीसीआयचं क्रिकेट ऑस्ट्रेलियाला पत्र