भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यांना देशातील काही राजकीय पक्षांकडून विरोध होत असला तरी डिसेंबर महिन्यात भारतात हे सामने खेळवले जातील हे जवळपास निश्चित झाले आहे. पण पुढील वर्षी होणा-या आयपीएल स्पर्धेत पाकिस्तानी खेळाडूंच्या समावेशावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. बीसीसीआयच्या अधिका-यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई आणि पुणे हे दोन संघ महाराष्ट्रातील असल्यामुळे आणि तेथील शिवसेना व महाराष्ट्र नवनिर्माण सेना या राजकीय पक्षांनी पाकिस्तान क्रिकेट संघाला तीव्र विरोध दर्शविलेला आहे. तसेच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी पुन्हा एकदा जनतेला पाकिस्तान विरूद्ध होणारे सामने उधळून लावण्याचे आवाहन केले आहे. बीसीसीआयचे राजीव शुक्ला, रत्नाकर शेट्टी आणि आयपीएलचे मुख्य सुंदर रामन यांनी गृहखात्याच्या अधिका-यांशी पाकिस्तान विरुद्धच्या एकदिवसीय आणि टी-२० सामन्यांचा अंतीम निर्णय घेण्यासाठीची बैठक घेतली होती. तसेच बैठकीदरम्यान सामन्यांचे आयोजन सेना प्रभावित भागात न करण्याच्या मुख्य मुद्यांवर चर्चा करण्यात आली. २१ नोव्हेंबरला आयपीएल कमिटीची बैठक होणार आहे. या बैठकीत आयपीएलमध्ये पाकिस्तानी खेळाडूंच्या समावेशाबाबत अंतीम निर्णय घेण्यात येणार आहे.