ज्येष्ठ माजी कॅरमपटू आणि आंतरराष्ट्रीय पंच जनार्दन संगम यांचे गुरुवारी हृदयविकाराच्या झटक्याने त्यांच्या राहत्या घरी निधन झाले. ते ६८ वर्षांचे होते.

प्रकृती अस्वस्थ झाल्यामुळे संगम यांना गुरुवारी हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथेच त्यांचे उपचारादरम्यान निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, दोन मुली आणि नातवंडे असा परिवार आहे.

संगम यांनी खेळाडू म्हणून नेव्हल डॉकयार्डचे प्रतिनिधित्व केले. परंतु खेळापेक्षा त्यांनी संघटनेची कार्ये करण्यास अधिक पसंती दिली. अनेक राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय सामन्यात प्रमुख पंचांची भूमिका बजावणाऱ्या संगम यांनी तांत्रिक अधिकारी म्हणूनही काम केले आहे. १९९२ ते २०१९ या २७ वर्षांच्या कालखंडात त्यांनी महाराष्ट्र कॅरम संघटनेच्या कार्यकारिणीवर संयुक्त सचिव पद सांभाळले. तसेच संघटनेचे माजी सचिव म्हणूनही ते कार्यरत होते. त्याशिवाय कॅरमच्या प्रसिद्धीसाठी वृत्तपत्रे आणि क्रीडा वाहिन्यांद्वारे त्यांनी अमूल्य योगदान दिले.