‘बीसीसीआय’चा अध्यक्ष गांगुलीकडे विनंती

सुनील गावस्कर, कपिलदेव, सचिन तेंडुलकर, विराट कोहली, इत्यादी अनेक आंतरराष्ट्रीय-राष्ट्रीय दर्जाच्या क्रिकेटपटूंच्या सामन्यांच्या नोंदी करणाऱ्या गुणलेखकांना उत्तरार्धातील आयुष्याचा जमाखर्च मांडताना अडचणीचे ठरत आहे. वयाच्या ५५व्या वर्षी निवृत्ती पत्करणाऱ्या ज्येष्ठ गुणलेखकांनी निवृत्तीनंतर मानधन मिळावेत, यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा (बीसीसीआय) अध्यक्ष सौरव गांगुलीकडे विनंती केली आहे.

मुंबई क्रिकेट संघटनेतील अनुभवी गुणलेखक विवेक गुप्ते यांच्या नेतृत्वाखाली देशातील १७ गुणलेखकांनी ई-मेलद्वारे गांगुली यांच्याकडे ही आर्थिक मदत मागितली आहे. ‘‘आम्ही ‘बीसीसीआय’कडे गुणलेखकांच्या निवृत्तीचे वय ५५वर्षांवरून ६० वर्षे करण्याची मागणी केली होती. ती मागणी आता मान्य करण्यात आली आहे. निवृत्ती गुणलेखकांनी सुमारे तीन दशके भारतीय क्रिकेटची सेवा केली आहे. ‘बीसीसीआय’च्या गुणलेखकास सामन्याच्या दिवशी प्रत्येकी १० हजार रुपये मानधन मिळते. परंतु करोनामुळे सर्वांचेच आर्थिक नुकसान झाले आहे.’’

‘बीसीसीआय’च्या धोरणानुसार निवृत्ती पत्करणाऱ्या माजी गुणलेखकांकडे आता कठीण काळात उत्पन्नाचे कोणतेही साधन नाही. ‘बीसीसीआय’च्या १७ ज्येष्ठ गुणलेखकांपैकी एम. एस. रेहमान (झारखंड) यांचा काही दिवसांपूर्वी मृत्यू झाला, तर बडोदा क्रिकेट संघटनेमधील सुनील लांडगे गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये निवृत्त झाले.