६५ व्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेची सांगता काही दिवसांपूर्वी हैदराबादच्या काचीबाऊली मैदानात झाली. अंतिम फेरीत महाराष्ट्राच्या संघाने बलाढ्य सेनादलावर मात करत स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं. तब्बल ११ वर्षांच्या कालावधीनंतर महाराष्ट्राने स्पर्धेचं विजेतेपद पटकावल्यामुळे सर्व स्तरातून संघाचं कौतुक करण्यात येत होतं. मात्र कबड्डीप्रेमींना आता आपल्या आवडत्या संघांचा थरार आता मुंबईत अनुभवायला मिळणार आहे.

अवश्य वाचा – कबड्डीची क्रिकेटला कडवी टक्कर, भारत-आफ्रिका कसोटीनंतर प्रेक्षकांची राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेला सर्वाधिक पसंती

महाराष्ट्र कबड्डी असोसिएशनच्या वतीने तिसऱ्या फेडरेशन चषकाचं आयोजन मुंबईत करण्यात येणार आहे. येत्या महिन्यात ९ ते १२ फेब्रुवारीदरम्यान ही स्पर्धा मुंबईत रंगेल अशी माहिती सुत्रांनी दिली आहे. या स्पर्धेत राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेतील सर्वोत्तम ८ संघ सहभाग घेतील. कर्नाटक, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, हरयाणा, राजस्थान, सेनादल आणि भारतीय रेल्वे हे संघ या स्पर्धेत सहभागी होतील अशी माहिती मिळते आहे. तर महिलांच्या गटात उत्तर प्रदेश, पंजाब, छत्तीसगड, हरयाणा, केरळ, हिमाचल प्रदेश आणि महाराष्ट्र हे संघ आपला सहभाग नोंदवतील.