वरिष्ठ राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा

अयोध्या (उत्तर प्रदेश) येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुलात सुरू असलेल्या पुरुषांच्या ६८व्या वरिष्ठ राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्राने बुधवारी गुजरातचा  ५१-१९ असा धुव्वा उडवला. ह-गटातील दुसऱ्या विजयासह महाराष्ट्राने बाद फेरी गाठली आहे.

महाराष्ट्राने पहिल्या दोन-तीन मिनिटांच्या झटापटीनंतर सातव्या मिनिटाला गुजरातवर पहिला लोण देत ११-४ अशी आघाडी घेतली. मग १०व्या मिनिटाला झटपट दुसरा लोण देत ही आघाडी २०-४ अशी वाढवली. त्यामुळे पहिल्या सत्रात २६-६ अशी आघाडी घेत महाराष्ट्राने  विजयाचा पाया रचला.

महाराष्ट्राने दुसऱ्या सत्रात पहिल्या सामन्याप्रमाणे बेसावध खेळ न खेळता आपला जोश कायम ठेवला व आणखी दोन लोण प्रतिस्पध्र्यावर चढवत सामना एकतर्फी केला. उत्तरार्धात महाराष्ट्राने पंकज  मोहिते आणि रिशांक देवाडिगा यांना विश्रांती दिली. पंकज, अजिंक्य पवार यांच्या धारदार चढाया त्याला गिरीश इरनाक व शुभम शिंदेच्या पकडींची मिळालेली भक्कम साथ यामुळे हा विजय सोपा झाला. याच गटात उत्तरांचलनेही गुजरातचा ३५-३४ असा एका गुणाने पराभव केला.

ब-गटात सेनादलाने दिल्लीचा ५३-२९) असा पाडाव केला, तर गतविजेत्या भारतीय रेल्वेने झारखंडला ३३-१४ असे नमवले.