*   संगकाराची एकाकी झुंज व्यर्थ
*   अष्टपैलू नॅथन मॅक्क्युलम सामनावीर
आव्हान सहज-सोपे दिसत असले तरी ते गाठताना होणारी ससेहोलपट मात्र किवींसाठी नवीन नाही. गोलंदाजीला पोषक खेळपट्टीवर न्यूझीलंडचे फलंदाज आत्मघात करत असताना नशिबाने मिळालेल्या सुयोग्य साथीच्या जोरावर त्यांनी रडतखडत एका विकेटने पार करत विजय मिळवला. कुमार संगकाराच्या झुंजार अर्धशतकी खेळीच्या बळावर १३८ धावा केल्या. त्यानंतर श्रीलंकेच्या गोलंदाजांनीही न्यूझीलंडच्या फलंदाजांना जखडून ठेवले आणि एका सनसनाटी लढतीचा अनुभव क्रिकेटरसिकांना मिळाला.
श्रीलंकेच्या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंडची सुरुवात चांगली झाली नसली तरी दोन बळी पटकावणाऱ्या अष्टपैलू नॅथन मॅक्क्युलमने ३२ धावांचे अमूल्य योगदान देत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.
तत्पूर्वी, श्रीलंकेने नाणेफेक जिंकत फलंदाजीचा निर्णय घेतला खरा, पण कुमार संगकाराचा अपवाद वगळता त्यांच्या एकाही फलंदाजाला न्यूझीलंडच्या तोफखान्यापुढे उभे राहता आले नाही. संगकाराने एकाकी झुंज देत ८ चौकारांच्या जोरावर ६८ धावांची खेळी साकारल्यामुळे श्रीलंकेला जेमतेम १३८ धावा करता आल्या. श्रीलंकेच्या आठ फलंदाजांना या वेळी दोन अंकी धावसंख्याही उभारता आली नाही. न्यूझीलंडच्या मिचेल मॅक्लेनघानने या वेळी चार विकेट्स पटकावत श्रीलंकेचे कंबरडे मोडले आणि अन्य गोलंदाजांची त्याला सुरेख साथ लाभल्याने न्यूझीलंडने श्रीलंकेच्या धावसंख्येला वेसण घालण्याचे काम चोख बजावले.
संक्षिप्त धावफलक
श्रीलंका : ३७.५ षटकांत सर्व बाद १३८ (कुमार संगकारा ६८; मिचेल मॅक्लेनघान ४/४३) पराभूत वि. न्यूझीलंड : ३६.३ षटकांत ९ बाद १३९ (नॅथन मॅक्क्युलम ३२; लसिथ मलिंगा ४/३४)
सामनावीर : नॅथन मॅक्क्युलम.