चॅम्पियन्स करंडक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पाकिस्तानने भारतावर दणदणीत विजय मिळवला. हुर्रियत नेता मिरवाईज उमर फारुखने या विजयाबद्दल पाकिस्तानचे अभिनंदन केले आहे. मात्र पाकिस्तानी संघाचे अभिनंदन करणाऱ्या मिरवाईजच्या ट्विटमुळे वाद झाला आहे. मिरवाईज उमर फारुखच्या ट्विटला भारतीय क्रिकेटपटू गौतम गंभीरने प्रत्युत्तर दिले आहे.

‘आसपासच्या परिसरात फटाके फोडले जात आहेत. ईद काही दिवस आधीच साजरी केली जात आहे, असे वाटते आहे. चांगला खेळ करणारा संघ जिंकला. पाकिस्तानी संघाचे अभिनंदन,’ असे ट्विट हुर्रियत नेता मिरवाईज उमर फारुखने केले आहे. मिरवाईजच्या ट्विटला गौतम गंभीरने प्रत्युत्तर दिले आहे. मिरवाईजचे ट्विट ‘गंभीर’पणे घेत गौतमने त्याला थेट पाकिस्तानला जाण्याचा सल्ला दिला आहे.

‘मिरवाईज सीमारेषा का ओलांडत नाही? तुला तिथे चांगले (चायनीज) फटाके मिळतील ? ईद तिथे साजरी केली जाते. मी तुम्हाला सामानाची बांधाबांध करण्यात मदत करेन,’ असे प्रत्युत्तर गौतम गंभीरने केले. त्यामुळे हा वाद वाढण्याची शक्यता आहे. मिरवाईजने याआधी पाकिस्तानी संघाने अंतिम फेरी गाठल्यावर अभिनंदनाचे ट्विट केले होते. पाकिस्तानने इंग्लंडचा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केल्यावर मिरवाईजने पाकिस्तानचे अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या होत्या.