फिफाच्या आवाहन समितीसमोर उपस्थिती
आंतरराष्ट्रीय फुटबॉल महासंघाच्या (फिफा) अध्यक्षपदावरून हकालपट्टी करण्यात आलेले सेप ब्लाटर यांनी त्यांच्यावरील आठ वर्षांच्या बंदीविरोधात लढा देण्याचा निर्धार केला आहे. मंगळवारी त्यांनी फिफाच्या आवाहन समितीसमोर उपस्थिती लावली. फिफाच्या आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी ब्लाटर आणि माजी उपाध्यक्ष मायकेल प्लॅटिनी यांच्यावर आठ वर्षांची बंदी घालण्यात आली आहे. या प्रकरणाची सुनावणी सुरू होण्याआधीच ब्लाटर फिफा मुख्यालयात दाखल झाले होते.
पदाचा गैरवापर करून ब्लाटर यांनी २०११मध्ये प्लॅटिनींना २ कोटी अमेरिकन डॉलर दिले होते. याप्रकरणी फिफाच्या आचारसंहिता समितीने ब्लाटर व प्लॅटिनी यांना आठ वर्षांच्या बंदीची शिक्षा सुनावली. जागतिक फुटबॉल क्षेत्रात दबदबा असलेल्या या दोघांनी काहीच चुकीचे न केल्याचा दावा केला होता. ही रक्कम प्लॅटिनींना त्यांनी केलेल्या कामासाठीच दिली असून त्याचा तोंडी करार झाला होता, असा दावा ब्लाटर व प्लॅटिनी यांनी केला.

सुनावणीबाबत प्लॅटिनी समाधानी
आंतरराष्ट्रीय फुटबॉल महासंघाच्या (फिफा) आवाहन समितीसमोर मंगळवारी झालेल्या सुनावणीवर युरोपियन फुटबॉल संघटनेचे प्रमुख मायकेल प्लॅटिनी यांनी समाधान व्यक्त केले आहे. आठ वर्षांच्या बंदीविरोधात प्लॅटिनींनी याचिका दाखल केली असून त्यावर मंगळवारी सुनावणी झाली. ‘‘सुनावणी उत्तम झाली. फुटबॉल क्षेत्रातील लोकांकडून याबाबत मला माहिती मिळाली. पुढे काय होते, हे पाहणे औत्सुक्याचे आहे,’’ अशी प्रतिक्रिया प्लॅटिनींनी दिली.