आंतरराष्ट्रीय फुटबॉल असोसिएशनचे (फिफा) निलंबित अध्यक्ष सेप ब्लाटरसमोरील अडचणी आणखी वाढण्याचे संकेत मिळत आहेत. फिफाच्या माजी सदस्यांना १०० कोटी अमेरिकन डॉलरची कथित लाच दिल्याप्रकरणी फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशनने (एफबीआय) ब्लाटर यांच्यामागे चौकशीचा ससेमिरा लावला असल्याचा दावा बीबीसी या वृत्तवाहिनीने केला आहे.
आयएसएल या क्रीडा विपणन कंपनीने १०० कोटी अमेरिकन डॉलर फिफाच्या माजी अधिकाऱ्यांना दिल्याचा पुरावा बीबीसीने केलेल्या तपासात समोर आला आहे. या अधिकाऱ्यांमध्ये फिफाचे माजी अध्यक्ष जोआओ हॅव्हेलँगे आणि माजी कार्यकारी अधिकारी रिचाडरे तेइक्सेइरा यांचाही समावेश आहे. या बदल्यात त्या कंपनीला १९९०च्या दशकात दूरदर्शन आणि विपणन अधिकार मिळाल्याचे अहवाल सांगतो. या व्यवहाराबाबत आपल्याला कोणतीही कल्पना नसल्याचे ब्लाटर यांचे म्हणणे आहे, परंतु बीबीसीने एफबीआयकडून मिळवलेल्या पत्रात ब्लाटर यांच्यावर संशयाची सुई जात असल्याचे स्पष्ट होत आहे.