खेळ हा पूर्वी मनोरंजनाचा एक भाग होता. पण काही वर्षांनी खेळात पैसा आला. कालांतराने हव्यासापोटी पैशांचा गैरवापर सुरू व्हायला लागला तेव्हा खेळाचा आत्मा हरवला आणि तेव्हापासून खेळाचा खेळखंडोबा k05झाला, याचे ताजे उदाहरण म्हणजे या आठवडय़ात रंगलेले फिफा नाटय़. एकामागून एक नाटय़पूर्ण घटनांनी फिफा चर्चेत आली. त्यांच्या अधिकाऱ्यांची अटक असो किंवा सेप ब्लाटर पाचव्यांदा अध्यक्षपदी विराजमान होणे असो, सारे काही धक्कादायक, अनाकलनीय, डोळे उघडणारं आणि दारुण सत्य दाखवणारं. मतांच्या गणितांचा सखोल अभ्यास आणि विरोधकांची मोळी मोडत ब्लाटर अध्यक्षपदाच्या खुर्चीत बसले आहेत, यापुढे ते नेमके कोणती पावले उचलून फिफाची छबी कशी स्वच्छ बनवतात, याकडेच साऱ्यांचे लक्ष असेल.
भ्रष्टाचार आणि लाचखोरीचे आरोप होऊनही ब्लाटर यांची फेर नियुक्ती बुचकळ्यात टाकणारी असली तरी ती अपेक्षितच होती. कारण गेली १७ वष्रे ब्लाटर यांनी फिफाच्या अध्यक्षपदाची धुरा सक्षमपणे संभाळली आहे. त्यांच्या कार्यकाळात विविध पदाधिकाऱ्यांवर भ्रष्टाचाराचे, लाचखोरीचे आरोप झाले असले तरी ब्लाटर यांनी त्याचा परिणाम खेळावर आणि खेळाडूंवर होऊ दिला नाही. ७९ वर्षीय ब्लाटर यांनी आपल्या कार्यकाळात खेळाचा विकास कसा होईल आणि छोटय़ातत्या छोटय़ा देशांपर्यंत तो कसा पोहोचेल याची काळजी घेतली. म्हणूनच त्यांच्या अध्यक्षपदावर टीका होत असतानाही आफ्रिका, आशिया, उत्तर व मध्य अमेरिका आणि ओशिनिआ येथील फुटबॉल संघटना ब्लाटर यांच्यामागे ठामपणे उभ्या होत्या. प्रत्यक्ष निवडणुकीत या संघटनांमधील किती मते ब्लाटर यांच्या पारडय़ात पडली हे सांगणे कठीण असले तरी आफ्रिकेची (सीएएफ) ५४, आशियाची (एएफसी) ४६, दक्षिण अमेरिकेची १० आणि ओशिनिआची ११ अशी मिळून १२१ मते ही ब्लाटर यांच्याकडे होती. स्पष्ट बहुमतासाठी त्यांना केवळ १९ मतांची आवश्यकता होती आणि तीच मते निर्णायक होती. १४० हा जादुई आकडा गाठताना त्यांना पहिल्या फेरीत १३३ मते मिळाल्यावर त्यांचा विजय निश्चित समजला जाऊ लागला आणि प्रिन्स अली यांनाही याची जाणीव झाल्याने त्यांनी माघार घेतली.
 १९७४ ला जोआओ हॅवेलँगे फिफाच्या अध्यक्षपदावर असताना त्यांच्यावरही लाचखोरीचे आरोप ठेवण्यात आले आणि काही काळाने ते सिद्धही झाले. याच काळात ब्लाटर यांनी आपल्या नेतृत्व गुणांची झलक दाखवून अध्यक्षपद आपल्याकडे खेचले. लुसाने विद्यापीठातून व्यावसाय आणि अर्थशास्त्राची पदवी घेतलेल्या ब्लाटर यांनी ‘फुटबॉलचा विकास’ या ब्रिदवाक्यासह कामाला सुरुवात केली. आफ्रिकन आणि आशियाई खंडातील देशांमध्ये ब्लाटर यांनी फुटबॉल विकासासाठी पावले उचलली. त्यांच्या याच सकारात्मक पुढाकाराचे फलित २०१५च्या निवडणुकीत त्यांना मिळाले. ब्लाटर यांच्या पुढकारामुळेच २००२चा विश्वचषक आशियात (जपान/कोरिया) आणि २०१०चा विश्वचषक आफ्रिकेत पहिल्यांदा खेळविण्यात आला. त्यामुळे या लहान देशांकडून त्यांना पािठबा मिळणे अपेक्षित होते. शुक्रवारी पार पडलेल्या फिफा बैठकीत ब्लाटर यांनी चार वर्षांचा ५७१८ दशलक्ष डॉलरचा आर्थिक लेखाजोखा सादर केला. यातील ७२ टक्के रक्कम म्हणजेच ३८९६ दशलक्ष डॉलर त्यांनी फुटबॉलच्या विकासासाठी खर्च केल्याचा अहवाल त्यांनी मांडला. ब्लाटर यांनी पदभार स्वीकारल्यानंतर फुटबॉल विकास प्रकल्पांवर अधिक भर देण्यात आला. १९९५ते ९९ या कालावधीत हा आकडा १४ दशलक्ष डॉलर इतका होता. १९९९-२००० या कार्यकाळात ब्लाटर यांनी विकास कामांसाठी ३८० दशलक्ष डॉलर खर्च केले. त्यानंतर २००३-०६ (४३७ दशलक्ष डॉलर), २००७-१० (७९४ दशलक्ष डॉलर) आणि २०११-१४ (१०५२ दशलक्ष डॉलर) या कार्यकाळात विकास प्रकल्पांचा निधी भरघोस वाढला.
मात्र आता परिस्थिती बदलली आहे. ब्लाटर जितके शक्तिशाली झाले, तेवढेच शक्तिशाली विरोधकही झाले आहेत. त्यांनी निवडणुकीची योग्य आकडेमोड करत सहज विजय मिळवला असला तरी त्यांची लढाई संपलेली नाही. भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली अधिकाऱ्यांच्या अटकेमुळे फिफाची मलीन झालेली प्रतिमा सुधारण्याचे शिवधनुष्य ब्लाटर यांना पेलावे लागणार आहे. लोकांमधील गमावलेला विश्वास, संलग्न संघटनांचे झालेले खच्चीकरण, विरोधकांची मनधरणी, प्रायोजकत्वांचा पािठबा या सर्व अडचणींवर मात करण्यासाठी ७९ वर्षीय ब्लाटर यांना चांगलीच कंबर कसावी लागणार आहे. अमेरिका आणि स्विस पोलिसांनी केलेल्या धरपकडीनंतर ब्लाटर यांच्या हाकलपट्टीची मागणी होऊ लागली. त्यात प्रामुख्याने युरोपियन फुटबॉल महासंघाची नाराजी फार काळ टिकून राहणे ब्लाटर यांच्यासाठी धोक्याचे आहे. ब्लाटर यांच्या नियुक्तीला युरोपियन महासंघानेच सर्वप्रथम विरोध दर्शविला आणि वेळ पडल्यास विश्वचषक स्पध्रेतून बाहेर पडण्याची तयारीही दर्शवली. आता ब्लाटर निवडून आल्यामुळे बहिष्काराची शक्यता आणखी तीव्र झाली आहे आणि तसे झाल्यास ३२ पैकी १३ देश विश्वचषकातून बाहेर पडतील. ही परिस्थिती बदलण्यासाठी ब्लाटर यांच्याकडे आणखी तीन वर्षांचा कालावधी आहे. युरोपियन देशांनी बहिष्कार घातल्यास स्पध्रेवर तर परिणाम होईलच, परंतु प्रायोजकही माघार घेतील आणि फिफाला हे परवडण्यासारखे नाही. त्यामुळे ही तारेवरची कसरत ब्लाटर कशी यशस्वीपणे पार पाडतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.