ऑस्ट्रेलियन खुली टेनिस स्पर्धा

सेरेना विल्यम्स आणि युवा अलेक्झांडर झ्वेरेवने आपापले सलामीचे सामने जिंकत ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेत विजयी सलामी दिली.

सेरेना या स्पर्धेचे विजेतेपद पटकावून मार्गारेट कोर्ट यांच्या २४ ग्रँडस्लॅम जेतेपदांच्या विक्रमाशी बरोबरी साधण्यासाठी सज्ज झाली आहे. २०१७ साली आठ आठवडय़ांची गर्भवती असताना सेरेनाने या स्पर्धेचे विजेतेपद मिळवले होते. त्यामुळे या स्पर्धेत पुन्हा विजयाची पुनरावृत्ती करण्याचा सेरेनाचा निर्धार आहे.

मंगळवारी झालेल्या सामन्यात सेरेनाने जर्मनीच्या तात्जाना मारियाला ६-०, ६-२ असे दोन सेटमध्ये सहज पराभूत केले. सेरेना ऑस्ट्रेलियन स्पर्धेचा किताब आठव्यांदा पटकावण्याच्या तयारीत असून त्याच लयीत तिचा खेळ होत आहे. दुसऱ्या फेरीत सेरेनाचा सामना कॅनडाच्या युजेनी बुचर्डशी होणार असून बुचर्डने चीनच्या पेंग शुईला पराभूत करत दुसरी फेरी गाठली आहे.

झेकच्या कॅरोलिना प्लिस्कोवाने मंगळवारी दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. दहाव्या मानांकित दार्या कास्ताकिना हिला स्वित्र्झलडच्या युवा टिमिया बॅसिंझकीने पराभवाचा धक्का दिला. अमेरिकेच्या मॅडिसन कीजने ऑस्ट्रेलियाच्या डेस्टानी आयवा हिला ६-२, ६-२ असे पराभूत केले.

पुरुषांच्या गटात चौथ्या मानांकित झ्वेरेव्हने अल्जाझ बेदेने याला ६-४, ६-१, ६-४ असे तीन सेटमध्ये सहज पराभूत केले. दुसरीकडे जपानच्या केई निशिकोरीला मात्र पहिल्याच सामन्यात विजयासाठी संघर्ष करावा लागला. निशिकोरीला नवख्या कामिल माझचरझ्ॉकवर विजय मिळवण्यासाठी पाच सेटपर्यंत लढत द्यावी लागली. रशियाचा १५वा मानांकित डॅनिल मेदवेदेव आणि इटलीच्या फॅबियो फॉगनिनी यांनी आपापले सामनेजिंकत आगेकूच केली.