17 December 2017

News Flash

सेरेना नव्हे स्लोअन!

* उपांत्यपूर्व फेरीत सेरेना विल्यम्सचा धक्कादायक पराभव * फेडरर-मरे उपांत्य फेरीत आमनेसामने बालपणापासून सेरेना तिच्यासाठी आदर्श

पीटीआय, मेलबर्न | Updated: January 24, 2013 4:07 AM

* उपांत्यपूर्व फेरीत सेरेना विल्यम्सचा धक्कादायक पराभव
* फेडरर-मरे उपांत्य फेरीत आमनेसामने
बालपणापासून सेरेना तिच्यासाठी आदर्श होती. तिच्यासारखे खेळावे आणि जगावर आधिराज्य गाजवावे हे स्वप्न तिने जोपासले होते. ती सेरेनाच्या देशाची म्हणजे अमेरिकेची. पण बुधवारी आपल्याला असलेली सेरेनाच साक्षात समोर उभी ठाकल्यावर १९ वर्षीय स्लोअन स्टीफन्स मुळीच डगमगली नाही. तिने आपल्या गुणवत्तेची चुणूक दाखवत धक्कादायक विजय नावावर केला.
स्पर्धेतील पहिल्या सामन्यापासून दुखापतींचे शुक्लकाष्ठ मागे लागलेल्या सेरेनाला या सामन्यात पाठदुखीने सतावले. या दुखापतीमुळे तिचा नेहमीचा आक्रमक खेळ मंदावला आणि स्टीफन्सने ३-६, ७-५, ६-४ असा संस्मरणीय विजय मिळवला.
ऑगस्ट महिन्यानंतर कुठल्याही स्पर्धेत पराभवाचा सामना न केलेली सेरेना जेतेपदाची प्रबळ दावेदार होती. गेल्या काही स्पर्धेतील तिचा भन्नाट फॉर्म पाहता, हे जेतेपद सेरेनासाठी सोपे होते. मात्र स्टीफन्सने सेरेनाच्या दुखापतींचा फायदा उठवत उपांत्य फेरीत धडक मारली. उपांत्य फेरीत तिचा मुकाबला व्हिक्टोरिया अझारेन्काशी होणार आहे.
सेरेनाने पहिला सेट जिंकत चांगली सुरुवात केली. मात्र दुसऱ्या सेटमध्ये तिची पाठदुखी बळावली. स्टीफन्सने आगेकूच करत दुसरा सेट नावावर केला. तिसऱ्या सेटमध्ये सेरेनाने दुखण्यातून सावरत पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला. मात्र स्टीफन्सने शानदार खेळाचे प्रदर्शन करत तिसऱ्या सेटसह सामन्यावर कब्जा केला.
अन्य लढतींमध्ये अझारेन्काने स्वेतलाना कुझ्नेत्सोव्हाचा ७-५, ६-१ असा पराभव करत उपांत्य फेरीत स्थान पक्के केले. दुखापतीतून सावरत पुनरागमन करणाऱ्या कुझ्नेत्सोव्हाने पहिल्या सेटमध्ये अझारेन्काला चांगलेच झगडायला लावले. मात्र दुसऱ्या सेटमध्ये अझारेन्काने वर्चस्व गाजवत सामना जिंकला.
पुरुषांमध्ये रॉजर फेडरर आणि अँडी मरे यांच्यात अंतिम फेरीत स्थान पटकावण्यासाठी मुकाबला रंगणार आहे. फेडररने फ्रान्सच्या आक्रमक जो विलफ्रेड त्सोंगाला नमवत उपांत्य फेरीत स्थान पटकावले. त्सोंगाच्या अफलातून फटकेबाजीला शैलीदार खेळाने उत्तर देत फेडररने ७-६, ४-६, ७-६, ३-६, ६-३ असा विजय मिळवला. फेडररला मॅच पॉइंट असताना त्सोंगाने चार गुण वाचवत पुनरागमनाचा प्रयत्न केला, मात्र तो अपुराच ठरला.
दुसऱ्या लढतीत इंग्लंडच्या अँडी मरेने जेरेमी चार्डीवर ६-४, ६-१, ६-२ असा सहज विजय मिळवत उपांत्य फेरी गाठली. या स्पर्धेच्या उपांत्य फेरीत दाखल होण्याची मरेची ही सलग चौथी वेळ आहे.
गेल्या वर्षी विम्बल्डन स्पर्धेत फेडररने मरेवर मात केली होती. मात्र ऑलिम्पिक लढतीत मरेने फेडररचा पराभव करत सुवर्णपदकावर नाव कोरले होते. हे दोघे पुन्हा एकदा आमनेसामने येणार असल्याने टेनिसरसिकांना चुरशीचा मुकाबला बघायला मिळणारे हे नक्की.
बोपण्णाचे आव्हान संपुष्टात
मेलबर्न :भारताच्या रोहन बोपण्णा याचे ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेतील आव्हान बुधवारी संपुष्टात आले. बोपण्णा व त्याची चीन तैपेईची सहकारी सु-वेई हेसिहा यांना क्वेता पेश्चके (चेक प्रजासत्ताक) व मार्सिन मॅटकोवस्की (पोलंड) यांनी ६-२, ६-३ असे पराभूत केले. पेश्चके व मॅटकोवस्की यांनी ५६ मिनिटांच्या खेळांत बोपण्णा व हेसिहा यांना निष्प्रभ केले. त्यांनी फोरहँडच्या ताकदवान फटक्यांचा बहारदार खेळ केला तसेच नेटजवळून प्लेसिंगचाही कल्पकतेने उपयोग केला.

First Published on January 24, 2013 4:07 am

Web Title: serena shocker blows tournament wide open