X
X

सेरेनाचे वर्तन चुकीचेच -नवरातिलोव्हा

अमेरिकेतील न्यूयॉर्क टाइम्स या वृत्तपत्राला दिलेल्या खास मुलाखतीत नवरातिलोव्हाने सेरेनावर भाष्य केले

न्यूयॉर्क : अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेच्या अंतिम सामन्यात सेरेना विल्यम्सने घडवलेले बेशिस्त वागणुकीचे वर्तन हे चुकीचेच होते, अशी प्रतिक्रिया १८ ग्रँडस्लॅम विजेतेपद नावावर असणारी महान टेनिसपटू मार्टिना नवरातिलोव्हा हिने मंगळवारी दिली. अंतिम सामन्यात जपानच्या नाओमी ओसाकाकडून सेरेनाला पराभव पत्करावा लागला, मात्र हा सामना सेरेनाच्या कोर्टवरील वर्तनामुळे व तिने पंचांशी घातलेल्या हुज्जतीमुळेच अधिक गाजला.

अमेरिकेतील न्यूयॉर्क टाइम्स या वृत्तपत्राला दिलेल्या खास मुलाखतीत नवरातिलोव्हाने सेरेनावर भाष्य केले. ती म्हणाली, ‘‘आपण जसा विचार करतो त्याप्रमाणेच आपल्याला सर्व काही मिळेल असे नसते. किंबहुना कोणत्याही खेळाडूद्वारे टेनिस कोर्टवर अशी वागणूक होणे म्हणजेच दुर्दैव आहे.’’

अंतिम सामन्यात सेरेनाने पंचांना अनुचित शब्दोद्गार उच्चारल्यामुळे ओसाकाला गुण बहाल करण्यात आला. याविषयी नवरातिलोव्हा म्हणाली, ‘‘सेरेनाशी भेदभाव करण्यात आला असे मला वाटते. कारण पुरुषांच्या सामन्यात यापेक्षाही खालच्या स्तरावर जाऊन अपशब्द उच्चारले जातात. मात्र त्यांना काहीही शिक्षा केली जात नाही. पण तरीही सेरेनाने स्वत:वर ताबा ठेवायला हवा होता.’’

‘‘सेरेना एक महान खेळाडू असून अनेकांसाठी ती प्रेरणा आहे. तिने तिच्या हक्कासाठी केलेला संघर्ष सर्वानाच माहीत आहे,’’ अशा शब्दांत नवरातिलोव्हाने सेरेनाचे काहीशा प्रमाणात कौतुकदेखील केले.

24
Just Now!
X