कन्यारत्न झाल्यानंतर जागतिक टेनिस क्षेत्रात ऑस्ट्रेलियन खुल्या स्पर्धेद्वारे पुनरागमन करण्यासाठी उत्सुक असलेल्या सेरेना विल्यम्सने अचानकरीत्या या स्पर्धेतून माघार घेतली आहे. त्यामुळे तिच्या चाहत्यांची निराशा होणार आहे.

‘‘गतवर्षी मिळविलेले विजेतेपद राखण्याइतकी माझी तयारी झाली नसल्यामुळेच मला हा निर्णय घ्यावा लागत आहे. सप्टेंबरमध्ये मुलीला जन्म दिल्यानंतर मी ग्रॅण्ड स्लॅम स्पर्धेसाठी आवश्यक असणारी शारीरिक तंदुरुस्ती मिळविण्यासाठी प्रयत्न करीत आहे. तथापि अपेक्षेइतकी तंदुरुस्ती झालेली नाही. माझे प्रशिक्षक व सहाय्यक स्पर्धक यांनीही मला शंभर टक्के तंदुरुस्त झाल्यानंतरच स्पर्धेत सहभागी होण्याचा सल्ला दिला आहे. केवळ भाग घेणे हे माझ्यासाठी महत्त्वाचे नसून त्यामध्ये विजेतेपद मिळविणे हेच माझे ध्येय आहे,’’ असे ३६ वर्षीय सेरेनाने सांगितले.

अपत्य प्राप्तीनंतर तिने केवळ एकाच स्पर्धेत भाग घेतला. अबू धाबी येथे नुकत्याच झालेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत तिला फ्रेंच विजेत्या येलेना ओस्तापेन्कोकडून निराशाजनक पराभव पत्करावा लागला होता.