अमेरिकन खुली टेनिस स्पर्धा

फ्रेंच विजेती अ‍ॅश्लेघ बार्टी आणि कॅरोलिना प्लिस्कोव्हा यांचे आव्हान संपुष्टात आले आहे, तर सेरेना विल्यम्सने दुखापतींची तमा न बाळगता अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत दिमाखदार विजय मिळवत २४व्या विक्रमी ग्रँडस्लॅम विजेतेपदाच्या दिशेने वाटचाल केली आहे.

सहा वेळा अमेरिकन विजेत्या सेरेनाने क्रोएशियाच्या २२व्या मानांकित पेट्रा मार्टिच हिचा ६-३, ६-४ असा पराभव केला. उपांत्यपूर्व फेरीत तिची चीनच्या वँग क्विंगाशी गाठ पडणार आहे. वँगने जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर असलेल्या बार्टीला नमवण्याची किमया साधली आहे. २७ वर्षीय वँगने बार्टीचे आव्हान ६-२, ६-४ असे मोडीत काढले.

उजव्या पायाच्या घोटय़ाला दुखापत झाल्यामुळे ३७ वर्षीय सेरेनाला दुसऱ्या सेटमध्ये वैद्यकीय विश्रांती घ्यावी लागली. परंतु त्यातून सावरत तिने १६व्यांदा या स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठली. यंदाच्या हंगामात आठव्या मानांकित सेरेनाला गुडघ्याच्या आणि पाठीच्या दुखापतीनेही त्रस्त केले आहे. सेरेनाने २०१७मध्ये ऑस्ट्रेलिया खुली टेनिस स्पर्धा ही अखेरची ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकली आहे. याशिवाय २०१४नंतर अमेरिकन विजेतेपदापासूनही वंचित राहिली आहे.

ब्रिटनच्या जोहाना कोंटाने चेक प्रजासत्ताकच्या प्लिस्कोव्हाचा ६-७ (१/७), ६-३, ७-५ असा पराभव केला. याचप्रमाणे युक्रेनच्या पाचव्या मानांकित एलिना स्व्हिटोलिनाने प्रथमच अमेरिकन स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठताना २०१७च्या उपविजेत्या मॅडिसन किजचा ७-५, ६-४ असा पाडाव केला.

जोकोव्हिचची माघार; वॉवरिंका उपांत्यपूर्व फेरीत

जागतिक क्रमवारीत अग्रस्थानावर असलेल्या गतविजेत्या नोव्हाक जोकोव्हिचला रविवारी अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेतून माघार घ्यावी लागली. डाव्या खांद्याच्या दुखापतीमुळे पहिले दोन सेट गमावल्यानंतर जोकोव्हिचने सामना अर्धवट सोडण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे स्वित्झर्लंडच्या स्टॅन वॉवरिंकाने उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. २०१६मध्ये वॉवरिंकाने जोकोव्हिचलाच अंतिम सामन्यात नमवून जेतेपद पटकावले होते. पाच वेळा अमेरिकन विजेतेपद पटकावणाऱ्या रॉजर फेडररने बेल्जियमच्या १५व्या मानांकित डेव्हिड गॉफिनचा ६-२, ६-२, ६-० असा ७९ मिनिटांत पराभव करून उपांत्यपूर्व फेरी गाठली. याचप्रमाणे डॅनिल मेदव्हेदेवने डॉमिनिक कोईपफेरचा ३-६, ६-३, ६-२ ७-६ (७/२) असा पराभव केला.

बोपण्णा पराभूत : पुरुष आणि मिश्र दुहेरी अशा दोन्ही गटांमधील रोहन बोपण्णाच्या पराभवांमुळे भारताचे अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. पुरुष दुहेरीत १५व्या मानांकित ग्रेट ब्रिटनच्या नील स्कुप्स्की आणि जॅमी मरे जोडीने एक तास आणि १५ मिनिटे चाललेल्या सामन्यात बोपण्णा आणि डेनिस शापोव्हालोव्ह जोडीचा ६-३, ६-४ असा पराभव केला. मिश्र दुहेरीत फॅब्रिक मार्टिन आणि रॅक्वेल अ‍ॅटावो जोडीने बोपण्णा आणि अ‍ॅबिगेल स्पीअर्स जोडीचा ७-५, ६-७ (४) असा पाडाव केला.

ब्रायनला दंड : रेषेवरील पंचांना उद्देशून रॅकेटच्या साहाय्याने नेम धरल्याची कृती साकारणारा अमेरिकेचा दुहेरीतील टेनिसपटू माइक ब्रायनला १० हजार डॉलर दंड ठोठावण्यात आला आहे. माइक आपला भाऊ  बॉबच्या साथीने पुरुष दुहेरीत खेळतो.

चालू वर्षांत मला दुखापतींचे आव्हान प्रामुख्याने पेलावे लागले. पेट्रा मार्टिच हिच्याविरुद्धच्या सामन्यात मला दुखापतीविरुद्ध आत्मविश्वासाने सामना करावा लागला. आता मला बरे वाटते आहे.

– सेरेना विल्यम्स