सर्जिओ अग्युरोच्या हॅट्ट्रिकच्या जोरावर मँचेस्टर सिटीने अर्सेनलवर ३-१ अशी मात केली. त्यामुळे प्रीमियर लीग फुटबॉलच्या गुणतालिकेत अव्वल स्थानावर असलेल्या लिव्हरपूलपासून मँचेस्टर सिटी संघ आता केवळ दोनच गुणांनी पिछाडीवर आहे.

मँचेस्टर सिटीचे प्रशिक्षक पेप गार्डिओला यांना संघाच्या या दमदार कामगिरीमुळे नक्कीच आनंद झाला आहे. न्यूकॅसलकडून २-१ असे पराभूत झाल्यानंतर सिटीला बसलेल्या धक्क्यानंतर या विजयामुळे दिलासा मिळाला आहे. दरम्यान, लिसेस्टरने लिव्हरपूलला १-१ असे बरोबरीत रोखल्याने सिटीला पुन्हा एकदा लिव्हरपूलच्या गुणांच्या जवळ पोहोचणे शक्य झाले आहे. मंगळवारच्या सामन्यात सिटीकडून पहिल्याच मिनिटाला अग्युरोने पहिला गोल करीत दणक्यात सुरुवात करून दिली. अर्सेनलकडून लॉरेंट कोसिलनीने गोल करीत संघाला बरोबरी साधून दिली. मध्यंतराला काही क्षण बाकी असतानाच गुंडोगानने दिलेल्या अप्रतिम पासवर अग्युरोने दुसरा गोल नोंदवला. त्यानंतर स्टर्लिगने दिलेल्या पासवर अग्युरोने पुन्हा गोल करीत हॅट्ट्रिकसह विजयावर शिक्कामोर्तब केले.

जर्गेन क्लॉप यांच्या मार्गदर्शनाखाली टोटनहॅमच्या संघाशी शनिवारी सिटीचा सामना होणार आहे. या दोन संघांमध्ये दुसऱ्या क्रमांकासाठीची झुंज होणार आहे.

‘‘न्यूकॅसलकडून पराभवानंतर संघाने दमदार पुनरागमन केले असून, गुणतालिकेत बऱ्याच घडामोडी घडू लागल्या आहेत. हेच प्रीमियर लीगचे वैशिष्टय़ असून ते तुम्हालादेखील माहिती आहे,’’ असे प्रशिक्षक गार्डिओला यांनी सांगितले.