विश्वातील सर्वोत्तम फुटबॉलपटूंपैकी एक मानल्या जाणाऱ्या ख्रिस्तियानो रोनाल्डोने केलेल्या दोन गोलच्या बळावर युव्हेंटसने सेरी ए फुटबॉल स्पर्धेतील रविवारी रात्री झालेल्या सामन्यात पार्मा संघावर २-१ असा विजय मिळवला. या विजयासह युव्हेंटसने गुणतालिकेतील अग्रस्थान कायम राखले आहे. युव्हेंटसच्या खात्यात सध्या २० सामन्यांतील १६ विजयांचे ५१ गुण जमा असून इंटर मिलान १४ विजयांच्या ४७ गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. रोनाल्डोने ४३व्या मिनिटाला पहिला गोल केला. मात्र आंद्रियास कॉर्नेलियूसच्या ५५व्या मिनिटाला केलेल्या गोलच्या जोरावर पार्माला बरोबरी साधता आली. अर्थातच पार्माचा हा आनंद फार काळ टिकला नाही. कारण तीन मिनिटांत लगेचच रोनाल्डोने (५८व्या) युव्हेंटससाठी दुसरा गोल झळकवला. अन्य लढतीत इंटर मिलानला लीसविरुद्ध १-१ अशा बरोबरीवर समाधान मानावे लागले. लिव्हरपूलची मँचेस्टर युनायटेडवर सरशी लिव्हरपूल : लिव्हरपूलने रविवारी मॅँचेस्टर युनायटेडला २-० नमवत इंग्लिश प्रीमियर लीग (ईपीएल) फुटबॉल स्पर्धेतील अव्वल स्थान आणखी भक्कम केले. लिव्हरपूलचा हा या हंगामातील २२ सामन्यांतील २१वा विजय असून १६ धावांची त्यांच्याकडे भक्कम आघाडी आहे. त्यांचा हा सलग १३वा विजय ठरला. व्हर्गिल व्ॉन डिकने १४व्याच मिनिटाला गोल करत लिव्हरपूलला आघाडी मिळवून दिली. वॅन डर्कचा हा या ‘ईपीएल’ हंगामातील चौथा गोल ठरला. त्यानंतर मोहम्मद सहालने अतिरिक्त वेळेत (९३वे मिनिट) दुसरा गोल करत यजमानांच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. मेसीचा निर्णायक गोल बार्सिलोना : लिओनेल मेसीने केलेल्या एकमेव निर्णायक गोलच्या बळावर बार्सिलोनाने सोमवारी ला लिगा फुटबॉलमध्ये ग्रॅनडावर १-० असा विजय मिळवला. मेसीने ७६व्या मिनिटाला गोल केला. या विजयानंतर अग्रस्थानी विराजमान असलेल्या बार्सिलोनाच्या खात्यात २० सामन्यांतून ४३ गुण जमा असून रेयाल माद्रिद तितक्याच गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. ११ रोनाल्डोने गेल्या सात सामन्यांत ११ गोल नोंदवले असून यंदाच्या सेरी ए हंगामात त्याने आतापर्यंत एकूण १६ गोल झळकावले आहेत.