सेरी-ए फुटबॉल स्पर्धेच्या सलग नवव्या विजेतेपदासाठी मोठी आघाडी घेण्याची युव्हेंटसची संधी हुकली. एसी मिलानने अनपेक्षित कामगिरी करत युव्हेंटसला ४-२ असा पराभवाचा धक्का दिला.

दुसऱ्या क्रमांकावरील लॅझियोला लीस संघाकडून १-२ असे पराभूत व्हावे लागल्यामुळे युव्हेंटसने १० गुणांची आघाडी कायम राखत अव्वल स्थान पटकावले आहे. एड्रियन रॅबिओट (४७व्या मिनिटाला) आणि ख्रिस्तियानो रोनाल्डो (५३व्या मिनिटाला) यांच्या गोलमुळे युव्हेंटसने भक्कम आघाडी घेतली होती. पण एसी मिलानने दुसऱ्या सत्रात अप्रतिम कामगिरी करत युव्हेंटसला एकापाठोपाठ धक्के  दिले. झ्लटान इब्राहिमोव्हिच, फ्रँक केसी, राफेल लिओ आणि आन्टे रेबिक यांनी गोल करत एसी मिलानला विजय मिळवून दिला.

तत्पूर्वी, अर्सेनल आणि लिसेस्टर सिटी यांच्यातील लढत १-१ अशी बरोबरीत सुटल्यामुळे चेल्सीला इंग्लिश प्रीमियर लीगच्या गुणतालिकेत तिसऱ्या क्रमांकावर मजल मारता आली. अर्सेनलकडून पाएरे-एमेरिक अबामेयांग याने तर लिसेस्टरकडून जेमी वार्डीने गोल केला.

दरम्यान, ला लिगा फुटबॉलमध्ये दक्षिण कोरियाच्या ली कँग-इन याने अखेरच्या क्षणाला गोल केल्यामुळे व्हॅलेंसियाला चार सामन्यांच्या पराभवाची मालिका खंडित करता आली. व्हॅलेंसियाने मंगळवारी मध्यरात्री झालेल्या या सामन्यात व्हॅलाडॉलिडवर २-१ असा विजय मिळवला. तर अन्य लढतीत अ‍ॅटलेटिको माद्रिदला सेल्टा विगोने १-१ असे बरोबरीत रोखले. अल्वारो मोराटाने (पहिले मिनिट) माद्रिदसाठी, तर फ्रॅन बेल्ट्रनने (४९वे मिनिट) सेल्टासाठी प्रत्येकी एक गोल केला.