नववर्षांला धडाक्यात प्रारंभ करताना ख्रिस्तियानो रोनाल्डोने आणखी एक मानाचा तुरा शिरपेचात रोवून ब्राझिलचे महान फुटबॉलपटू पेले यांचा ७५७ गोलचा विक्रम मोडित काढला. रोनाल्डोने आतापर्यंतच्या कारकीर्दीत सर्वप्रकारच्या सामन्यांत नोंदवलेल्या अधिकृत गोलांची संख्या ८५८ झाली असून त्याच्या दोन गोलमुळेच युव्हेंटसने रविवारी मध्यरात्री झालेल्या सेरी-ए लीग फुटबॉलमधील सामन्यात उडिन्सला ४-१ अशी धूळ चारली.

आंतरराष्ट्रीय पातळीवर पोर्तुगालचे प्रतिनिधित्व करणाऱ्या रोनाल्डोने ३१व्या मिनिटाला पहिला गोल झळकावून पेले यांच्या विक्रमाची बरोबरी साधली. तर उत्तरार्धात ७०व्या मिनिटाला दुसरा गोल झळकावून त्याने पेलेंचा विक्रम मोडित काढला. आता फक्त माजी फुटबॉलपटू जोसेफ बिकान (८०५ गोल) रोनाल्डोपेक्षा पुढे आहेत.

रोनाल्डोच्या दोन गोलबरोबरच फेड्रिकी चीसा (४९) आणि पावलो डिबेला (९३) यांनीही युव्हेंटससाठी एकेक गोल नोंदवला. तर मव्‍‌र्हिन झीगीलॅरने (९०) उडिन्ससाठी एकमेव गोल केला. युव्हेंटसने (१४ सामन्यांत २७ गुण) या विजयासह गुणतालिकेत पाचवे स्थान मिळवले.

अन्य लढतीत लॉटुरो मार्टिनेझने साकारलेल्या हॅट्ट्रिकच्या बळावर इंटर मिलानने क्रोटोनला ६-२ असे नामोहरम केले. मार्टिनेझच्या तीन गोलला रोमेलू लुकाकू आणि अशरफ हकिमी यांचा प्रत्येकी एक गोल, तसेच लुका मॅरोनच्या स्वयंगोलची साथ लाभली. या विजयासह इंटर मिलानने गुणतालिकेत दुसरे स्थान मिळवले.

मेसीच्या ७५०व्या लढतीत बार्सिलोना विजयी

बार्सिलोनासाठी ७५०वा सामना खेळणाऱ्या लिओनेल मेसीने संघाच्या विजयात बहुमूल्य योगदान दिले. मेसीने दिलेल्या पासचे फँक डी जाँगने (२७) गोलमध्ये रुपांतर केल्यामुळे बार्सिलोनाने ला लिगा फुटबॉलमध्ये हुएस्कावर १-० असा विजय मिळवला. झावी हर्नाडेझने बार्सिलोनासाठी सर्वाधिक ७६७ सामने खेळले आहेत.

२० सलग २०व्या वर्षी रोनाल्डोने किमान एक गोल झळकावण्याची किमया साधली. तसेच गेल्या १५ हंगामांत सातत्याने त्याने क्लब आणि देशासाठी किमान २० गोल नोंदवले आहेत.