ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेलेल्या भारतीय संघाला कसोटी मालिकेपूर्वीच धक्का बसला आहे. भारताचा आघाडीचा फलंदाज पृथ्वी शॉला दुखापत झाली असून त्याला पहिल्या कसोटीमधून वगळण्यात आले आहे. पृथ्वी शॉ पहिल्या कसोटीत खेळणार की नाही असे बीसीसीआयने ट्विट करुन सांगितले आहे.

भारतीय संघ सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असून चार सामन्याची कसोटी मालिका सुरू होण्यापूर्वी भारतीय संघाचा सिडनीत सराव सामना सुरु आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलिया एकादश विरुद्ध हा सामना सुरु आहे. या सामन्यात क्षेत्ररक्षण करताना पृथ्वी शॉच्या पायाला दुखापत झाली आहे. सीमारेषेजवळ झेल टिपताना पृथ्वीच्या पायाला दुखापत झाली. यानंतर पृथ्वीला टीम इंडियाच्या सपोर्ट स्टाफने उचलून ड्रेसिंग रुममध्ये नेले. बीसीसीआयने पृथ्वी शॉच्या दुखापतीविषयी माहिती दिली आहे. ‘पृथ्वी शॉच्या डाव्या पायाला दुखापत झाली असून तपासणीसाठी त्याला रुग्णालयात नेण्यात आले आहे’, असे बीसीसीआयने सांगितले.

त्यानंतर केलेल्या ट्विटमध्ये पृथ्वीला पहिल्या कसोटीतून वगळण्यात आल्याचेही बीसीसीआयने सांगितले आहे.

वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेत कसोटीत पदार्पण करणाऱ्या पृथ्वी शॉने त्याच्या फलंदाजीने क्रिकेटप्रेमींवर छाप पाडली आहे. ऑस्ट्रेलिया एकादशविरोधात सराव सामन्यातही पृथ्वी शॉने ६५ धावांची खेळी केली होती. मात्र, कसोटी मालिकेपूर्वीच पृथ्वी शॉला दुखापत झाल्याने पहिल्या कसोटीला मुकावे लागत असले तरी मालिकेमध्ये तो खेळणार की नाही हे तो कशाप्रकारे या दुखापतीमधून रिकव्हर होतो यावर अवलंबून आहे.