मॉस्को : भारताचा ग्रँडमास्टर एस. पी. सेतुरामन याने आपल्याच देशाच्या दीप सेनगुप्ता याच्यावर मात करत एरोफ्लॉट खुल्या बुद्धिबळ स्पर्धेतील सलग दुसऱ्या विजयाची नोंद केली. या विजयामुळे सेतुरामनने अन्य तीन जणांसह संयुक्तपणे अव्वल स्थान प्राप्त केले आहे.

अव्वल मानांकित रशियाचा ग्रँडमास्टर व्लादिस्लाव्ह अर्टेमिएव्ह याला मात्र तुर्कस्तानचा ग्रँडमास्टर इमरे कॅन याच्याविरुद्ध बरोबरीवर समाधान मानावे लागले. भारताच्या सहाव्या मानांकित बी. अधिबान याने उझबेकिस्तानचा ग्रँडमास्टर जावोखीर सिंदारोव्ह याच्याविरुद्धचा डाव बरोबरीत सोडवला. त्यामुळे अधिबानने कार्तिकेयन मुरली, युवा ग्रँडमास्टर आर. प्रज्ञानंद, एन. आर. विशाख तसेच १३ वर्षीय एम. प्रणेश यांच्यासह १.५ गुणांनिशी संयुक्तपणे दुसरे स्थान पटकावले आहे.

प्रणेश याने ग्रँडमास्टर बोरिस साव्हचेंको याच्यावर विजय मिळवत सर्वानाच आश्चर्याचा धक्का दिला. रशियाच्या बोरिसने सुरेख चाली रचत सुरुवातीपासूनच प्रणेशला गोंधळात टाकले. पण स्कँडिनेव्हियन बचाव पद्धतीने सुरू झालेल्या या डावात लय सापडल्यानंतर भारताच्या प्रणेशने अप्रतिम खेळ करत २१व्या चालीतच विजय साकारला. प्रज्ञानंदने स्टेफान पोगोस्यान याच्याविरुद्ध बरोबरी पत्करली.