भारताच्या पी. हरिकृष्ण व एस. पी. सेतुरामन यांनी जागतिक चषक बुद्धिबळ स्पर्धेत विजयी सलामी नोंदवली. मात्र सूर्यशेखर गांगुलीला पराभवाचा धक्का बसला.
हरिकृष्णने ऑस्ट्रेलियाच्या मॅक्स इलिंगवर्थवर मात केली. त्याने प्याद्याचा बळी देत सुरेख व्यूहरचना मिळवली. तेथून त्याने आक्रमक खेळ करीत मॅक्सचा बचाव निष्प्रभ केला व सहज विजय मिळविला.
ग्रॅण्डमास्टर सेतुरामनलाही रशियाच्या सनान सिजुगिरोवविरुद्ध विजय मिळवताना फारशी अडचण आली नाही. त्याने डावाच्या सुरुवातीला काही प्यादी जिंकून डावावर नियंत्रण मिळवले व शेवटपर्यंत आपली बाजू वरचढ ठेवत झटपट विजय मिळवला. दुसऱ्या फेरीत स्थान मिळवण्यासाठी हरिकृष्ण व सेतुरामन यांना आपल्या प्रतिस्पर्धी खेळाडूंविरुद्धच्या दुसऱ्या डावात अध्र्या गुणाची आवश्यकता आहे.
भारताच्या बी. अधिबानला रशियाच्या व्लादिमीर फेदोसीवविरुद्ध बरोबरी स्वीकारावी लागली. त्याचा सहकारी विदित गुजराथीलाही क्युबाच्या ब्रुझोन लाझारोवने बरोबरीत रोखले. एम. आर. ललितबाबूने पोलंडच्या रादोस्लाव्ह वोजताझेक या अनुभवी खेळाडूला बरोबरीत ठेवत अनपेक्षित कामगिरी केली.
सूर्यशेखरला मात्र रशियाच्या व्लादिस्लाव आर्तेमिव्हविरुद्ध पहिल्या डावात पराभव स्वीकारावा लागला.