कर्णधार राणी रामपालसह भारतीय महिला हॉकी संघाच्या सात खेळाडूंनी करोनावर मात केली आहे. त्यामुळे आता हे खेळाडू भारतीय क्रीडा प्राधिकरण (साई) केंद्रात प्रशिक्षण घेण्यासाठी उत्साहित आहेत. राणीसमवेत सविता पूनिया, शर्मिला देवी, रजनी, नवजोत कौर, नवनीत कौर आणि सुशीला यांच्यासह संघाचे व्हिडिओ विश्लेषक अमृत प्रकाश आणि वैज्ञानिक सल्लागार वेन लोम्बार्ड या करोनाचा संसर्ग झाला होता.

२४ एप्रिल रोजी केलेल्या तपासणीत करोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर गेल्या दोन आठवड्यांपासून या सदस्यांना क्वारंटाइन ठेवण्यात आले होते. बंगळुरूच्या नॅशनल कॅम्पमध्ये परतल्यानंतर हे खेळाडू पॉझिटिव्ह आढळले.

राणीने ट्विटरवर लिहिले, “गेल्या दोन आठवड्यांत मेसेजेस व फोन कॉल्सद्वारे प्रेम आणि मानसिक पाठबळ दिल्याबद्दल सर्वांचे आभार. मी, माझा संघ आणि सहकार्य कर्मचारी आता करोनातून पूर्णपणे बरे झालो आहेत. मित्र, चाहते यांचे मी आभार मानते. आमची चांगली काळजी घेतल्याबद्दल हॉकी इंडिया आणि साईचे विशेष आभार.”

 

या कठीण काळात गरजूंना सर्वतोपरी मदत देण्याचे आवाहन कर्णधार राणी रामपालने देशवासियांना केले. ती म्हणाली, “अनेक लोक आपल्या जवळच्या व्यक्तींना गमावत आहेत आणि हे पाहून खूप वाईट वाटले. कृपया आपल्या जवळच्या आणि प्रियजनांना जितके शक्य होईल तितकी मदत करा. चला या साथीशी एकत्र लढुया. सुरक्षित रहा, मास्क घाला आणि करोनाशी संबंधित सर्व मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोरपणे पालन करा.”