अफगाणिस्तान संघाने शनिवारी टी-२० मध्ये नवीन करिश्मा केला आहे. सात चेंडूवर एकापाठोपाठ सात षटकार लगावण्याची किमया अफगाणिस्तानच्या संघाने केली आहे. बांग्लादेशात सुरु असलेल्या त्रिकोणीय मालिकेच्या पहिल्या सामन्यात अफगानिस्तानच्या संघाने झिम्बाब्वेचा २८ धावांनी पराभव केला. मोहम्मद नबी आणि नजीबुल्लाह यांनी अफगाणिस्तानच्या विजयात मोलाची भूमिका पार पाडली.

अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी मोहम्मद नबी आणि नजीबुल्लाह यांच्याबळावर अफगाणिस्तानने झिम्बाब्वेसमोर १९८ धावांचे लक्ष्य ठेवले होते. प्रतिउत्तर झिम्बाब्वेच्या संघाला केवळ १६९ धावा करता आल्या.

पहिल्या टी-२० सामन्यात मोहम्मद नबी आणि नजीबुल्लाह यांनी सलग सात चेंडूवर सात षटकार लावले आहेत. तरीदेखील त्यांना भारताचा फलंदाज युवराजचा विक्रम मोडता आला नाही. प्रथम फलंदाजी करताना १७ व्या षटकाच्या तिसऱ्या, चौथ्या, पाचव्या आणि सहाव्या चेंडूवर मोहम्मद नबीने चार षटकार लगावले. त्यानंतर १८ व्या षटकाच्या पहिल्या तीन चेंडूवर नजीबुल्लाहने सलग तीन षटकार लगावले. युवराजने इंग्लंडच्या ब्रॉडच्या एका षटकात सहा षटकार लगावले होते. त्यामुळे युवीचा विक्रम अद्यापही अबाधित आहे.