News Flash

नव्या दमाच्या खेळाडूंवर संघांची भिस्त!

प्रो-कबड्डीच्या सातव्या हंगामाला आजपासून प्रारंभ

प्रो कबड्डी लीगच्या सातव्या हंगामाच्या चषकाचे शुक्रवारी हैदराबादमध्ये अनावरण करण्यात आले. या वेळी दीपक हुडा (जयपूर पिंक पँथर्स), सुनील कुमार (गुजरात फॉच्र्युनजायंट्स), मणिंदर सिंग (बंगाल वॉरियर्स), सुरजित सिंग (पुणेरी पलटण), फझल अत्राचाली (यू मुंबा), रोहित कुमार (बेंगळूरु बुल्स), अबोझर मुहाजिरमिघानी (तेलुगू टायटन्स), जोगिंदर नरवाल (दबंग दिल्ली), धरमराज चेरलाथन (हरयाणा स्टीलर्स), अजय ठाकूर (तमिळ थलायव्हा), प्रदीप नरवाल (पाटणा पायरेट्स) आणि नितीश कुमार (यूपी योद्धाज) हे कर्णधार उपस्थित होते.

प्रो-कबड्डीच्या सातव्या हंगामाला आजपासून प्रारंभ; यजमान तेलुगू टायटन्स आणि यू मुंबा यांच्यात सलामीचा सामना

हैदराबाद : प्रो कबड्डी लीगच्या सहा महिन्यांपूर्वी झालेल्या सहाव्या हंगामात जुन्या आणि अनुभवी खेळाडूंची सद्दी संपल्याचे अधोरेखित केले. राकेश कुमार, अनुप कुमार या अनुभवी खेळाडूंनी प्रशिक्षकाच्या भूमिकेत जाणे पसंत केले. आता शनिवारपासून हैदराबाद येथे सुरू होणाऱ्या सातव्या हंगामात सर्वच संघांची भिस्त ताज्या दमाच्या नव्या खेळाडूंवर असणार आहे. पहिल्या लढतीत यजमान तेलुगू टायटन्सचा यू मुंबाशी सामना होईल, तर पाटणा पायरेट्स गतविजेत्या बेंगळूरु बुल्सला आव्हान देईल.

हैदराबादमध्ये शुक्रवारी प्रो कबड्डी लीगच्या चषकाचे यंदाच्या हंगामातील कर्णधारांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. या वेळी १२ संघांच्या कर्णधारांनी नव्या खेळाडूंवरच विश्वास प्रकट केला. या वेळी पुणेरी पलटणचा संघनायक सुरजित सिंग म्हणाला, ‘‘जुन्या-नव्या खेळाडूंचा सुरेख समन्वय आमच्या संघात साधला गेला आहे. कनिष्ठ गटातील दोन नव्या खेळाडूंकडून दमदार कामगिरीची आशा आहे.’’

हरयाणाच्या संघात युवा खेळाडूंचा विशेष भरणा आहे. त्यामुळे हा संघ शानदार कामगिरी करील, अशी प्रतिक्रिया हरयाणा स्टीलर्सचा कर्णधार धरमराज चेरलाथनने व्यक्त केली. जयपूर पिंक पँथर्सचा कर्णधार दीपक हुडाने लिलावामुळे संघात बराच बदल झाल्याचे कबूल केले. आक्रमणाचे आता अनेक पर्याय संघात आहेत. पण प्रत्यक्ष सामन्यात आमची सांघिक ताकद दिसेल, असे हुडाने सांगितले.

गुजरात फॉच्र्युनजायंट्सचा कर्णधार सुनील कुमारने म्हटले की, गुजरातच्या संघात काही नव्या खेळाडूंचा समावेश करण्यात आला असून, ते आश्चर्यकारक कामगिरी करून दाखवतील. यूपी योद्धाजचा युवा संघनायक नितीश कुमारने म्हटले की, ‘‘कर्णधारपदाचे कोणतेही अतिरिक्त दडपण माझ्यावर नसेल. मी माझ्या नैसर्गिक खेळाचे प्रदर्शन करीन.’’

* तेलुगू टायटन्स वि. यू मुंबा

* पाटणा पायरेट्स वि. बेंगळूरु बुल्स

* वेळ : सायंकाळी ७.३० वा.

* थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, २, स्टार स्पोर्ट्स १ हिंदी, स्टार स्पोर्ट्स १ मराठी.

गुजरात आणि तमिळ संघ आव्हानात्मक – रोहित

प्रो कबड्डीच्या सातव्या हंगामात गुजरात फॉच्र्युनजायंट्स आणि तमिळ थलायव्हा हे संघ आव्हानात्मक आहेत, असे मत बेंगळूरु बुल्सचा संघनायक रोहित कुमारने व्यक्त केले. ‘‘यंदाच्या हंगामात दुहेरी राऊंड रॉबिन पद्धतीचा वापर होणार असल्याने साखळीत प्रत्येक संघाला अन्य संघांशी दोनदा खेळायची संधी मिळेल. प्रत्येक सामना जिंकण्याचे आमचे उद्दिष्ट असेल. मात्र पराभूत झालो तरी ते अंतर सात गुणांच्या आतील असेल, याची काळजी घेऊ. प्रशिक्षकांनी आम्हाला कसे खेळायचे आणि विजेतेपद टिकवायचे, याचा मंत्र दिला आहे,’’ असे रोहितने सांगितले.

नवा सिद्धार्थ उदयास येईल – फझल

गेल्या हंगामात यू मुंबा संघात ६० ते ७० टक्के युवा खेळाडू होते. यंदा हे प्रमाण वाढले आहे. सिद्धार्थ देसाई हा नवा खेळाडू गेल्या हंगामात उदयास आला. तो यंदा आमच्याकडे नसला तरी नवा सिद्धार्थ उदयास येईल, असा आशावाद यू मुंबाचा कर्णधार फझल अत्राचालीने व्यक्त केला. गेल्या हंगामात यू मुंबाचे प्रतिनिधित्व करणारा सिद्धार्थ यंदाच्या हंगामात तेलुगू टायटन्सकडून खेळणार आहे. याबाबत फझल म्हणाला की, ‘‘तेलुगू टायटन्सशी आमचा पहिलाच सामना आहे. सिद्धार्थसोबत खेळल्याने त्याचे कच्चे दुवे आम्हाला माहीत आहेत. त्यामुळे त्याला नियंत्रित ठेवण्यासाठी योग्य रणनीती आम्ही आखली आहे.’’

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 20, 2019 5:47 am

Web Title: seventh season of pro kabaddi league starting today zws 70
टॅग : Pro Kabaddi League
Next Stories
1 Pro Kabaddi Season 6 Final : बंगळुरु बु्ल्सची गुजरातवर मात, पवन शेरावत चमकला
2 प्रो कबड्डी लीग : बेंगळूरु की गुजरात?
3 Pro Kabaddi Season 6 : उत्तर प्रदेशचं आव्हान संपुष्टात, गुजरात अंतिम फेरीत
Just Now!
X