दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेसाठी महिला संघ जाहीर

नवी दिल्ली : अनुभवी क्रिकेटपटू मिताली राज हिने ट्वेन्टी-२० क्रिकेटमधून घेतलेल्या निवृत्तीनंतर आता तिच्या जागी १५ वर्षीय शफाली वर्माची आगामी दक्षिण आफ्रिका संघाविरुद्धच्या ट्वेन्टी-२० मालिकेसाठी भारतीय महिला क्रिकेट संघात निवड करण्यात आली आहे.

महिला ट्वेन्टी-२० चॅलेंजर क्रिकेट स्पर्धेत तसेच वयोगटाच्या स्पर्धामध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या शफालीला थेट भारतीय संघाची दारे खुली झाली आहेत. मितालीच्या नेतृत्वाखाली हरयाणाच्या शफालीने महिलांच्या ट्वेन्टी-२० चॅलेंजर स्पर्धेत वेलोसिटी संघाचे प्रतिनिधित्व केले होते.

तीन सामन्यांच्या मालिकेसाठी एकदिवसीय संघाचे नेतृत्व मिताली सांभाळत असून हरमनप्रीत कौरकडे पाच ट्वेन्टी-२० सामन्यांच्या मालिकेसाठी कर्णधारपदाची जबाबदारी असेल. गुरुवारी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या मुख्यालयात झालेल्या निवड समितीच्या बैठकीत एकदिवसीय व ट्वेन्टी-२० मालिकेसाठी भारतीय महिला संघ निवडण्यात आला.

एकदिवसीय संघ

मिताली राज (कर्णधार), जेमिमा रॉड्रिग्स, हरमनप्रीत कौर, पूनम राऊत, स्मृती मानधना, दीप्ती शर्मा, तानिया भाटिया, झुलन गोस्वामी, शिखा पांडे, मानसी जोशी, एकता बिश्त, पूनम यादव, डी. हेमलता, राजेश्वरी गायकवाड, प्रिया पूनिया.

ट्वेन्टी-२० संघ

हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना, जेमिमा रॉड्रिग्स, दीप्ती शर्मा, तानिया भाटिया, पूनम यादव, शिखा पांडे, अरुंधती रेड्डी, पूजा वस्त्रकार, वेदा कृष्णमूर्ती, हरलीन देवल, अनुजा पाटील, शफाली वर्मा, मानसी जोशी, राधा यादव.