आयसीसीच्या ताज्या फलंदाजांच्या टी-20 क्रमवारीत भारतीय महिला संघाची सलामीवीर फलंदाज शफाली वर्मा अव्वल स्थानी कायम आहे. दक्षिण आफ्रिकेविरूद्ध नुकत्याच झालेल्या टी-20 मालिकेच्या शेवटच्या सामन्यात शफालीने 30 चेंडूत 60 धावा केल्या. या कामगिरीचा तिला रेटिंग गुणांमध्ये फायदा झाला आहे.

शफालीने 776 रेटिंग गुण मिळवले आहेत. ऑस्ट्रेलियाच्या बेथ मूनीपासून ती 35 गुणांनी पुढे आहे. शफालीशिवाय स्मृती मानधनासुद्धा सुधारित क्रमवारीत 6व्या क्रमांकावर आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या अखेरच्या सामन्यात स्मृतीने 28 चेंडूत नाबाद 48 धावा केल्या.

राजेश्वरी गायकवाड  कारकिर्दीतील सर्वोत्तम स्थानी

भारताची डावखुरी फिरकीपटू राजेश्वरी गायकवाडने गोलंदाजांच्या क्रमवारीत कारकीर्दीतील सर्वोत्कृष्ट 13व्या स्थानावर झेप घेतली आहे. वेगवान गोलंदाज अरुंधती रेड्डीही 15 स्थानांच्या सुधारणासह 56व्या स्थानी पोहोचला आहे.

दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार सून लुसेने फलंदाजांमध्ये एक स्थानाची झेप घेत 37व्या क्रमांकावर पोहोचली आहे. तर वेगवान गोलंदाज तूमी सेखुखूनने गोलंदाजांच्या क्रमवारीत 42वा क्रमांक मिळवला आहे.

अष्टपैलू नाडिन डी क्रॅलेक दोन स्थानांच्या सुधारणेसह मोसेलिन डॅनिएल्ससह संयुक्तपणे 66व्या स्थानी आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यात नाबाद 73 धावांची खेळी साकारणारी ऑस्ट्रेलियाची अष्टपैलू क्रिकेटपटू अॅश्ले गार्डनर कारकीर्दीतील सर्वोत्कृष्ट 11व्या स्थानावर पोहोचली आहे. लेगस्पिनर जॉर्जिया व्हेरहॅम दोन स्थानांची झेप घेऊन 10व्या तर, निकोला कॅरी 57व्या स्थानावर आहे.