27 November 2020

News Flash

अरेरे! शफाली सलग दुसऱ्यांदा ठरली कमनशिबी

भारताने सामना जिंकला, पण...

शफाली वर्मा

T20 World Cup IND vs SL : टी २० विश्वचषक २०२० स्पर्धेत भारताने श्रीलंकेच्या संघाचा ७ गडी राखून सहज पराभव केला. श्रीलंकेची कर्णधार चमारी अटापटू (३३) आणि दिलहारी (नाबाद २५) यांच्या खेळीमुळे श्रीलंकेने २० षटकात भारताला ११४ धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना शफाली वर्माने धडाकेबाज ४७ धावांची खेळी केली आणि भारताला विजय मिळवून दिला. या विजयासह भारताने साखळी फेरीतील चारही सामने जिंकत अ गटात अव्वल स्थान कायम राखले. चार बळी मिळवणाऱ्या राधा यादवला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.

T20 World Cup IND vs SL : शफालीचा धडाका; भारताचा विजयी ‘चौकार’

या सामन्यात शफाली वर्माने पुन्हा एकदा दमदार खेळी केली. पण सलग दुसऱ्यांदा ती कमनशिबी ठरली. ४७ धावांवर असताना शफालीला धावबाद व्हावे लागले. गेल्या सामन्यात न्यूझीलंड विरूद्ध शफाली ४६ धावांवर झेलबाद झाली होती. श्रीलंकेविरूद्धच्या सामन्यात ती ४७ धावांवर बाद झाली. त्यामुळे सलग दोन सामन्यात तिचे अर्धशतक हुकले.

असा रंगला सामना

सामन्यात श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला, पण त्यांचा निर्णय पूर्णपणे चुकला. दिप्ती शर्माने उमेशा थिमासीनीला दोन धावांवर बाद केलं आणि भारताला पहिला धक्का दिला. त्यानंतर चांगली भागीदारी होत असतानाच १७ चेंडूत १२ धावा करणारी हर्षिता माधवी त्रिफळाचीत झाली. राजेश्वरी गायकवाडने तिला माघारी धाडले. श्रीलंकेची कर्णधार चमारी अटापटू हिने चांगली सुरूवात करत ३३ धावा केल्या. त्यात ५ चौकार आणि एका षटकाराचा समावेश होता, पण मोठा फटका मारताना ती झेलबाद झाली.

अटापटू बाद झाल्यावर श्रीलंकेच्या डावाला गळती लागली. हसीनी परेरा (७), करूणरत्ने (७), सिरीवर्धने (१३), अनुष्का संजीवनी (१) हे फलंदाज झटपट बाद झाले. त्यामुळे शंभरीच्या आत श्रीलंकेचे सात गडी माघारी परतले होते. निलाक्षी डी सिल्वा आणि दिलहारी यांनी काही काळ खेळपट्टीवर तग धरला, पण अखेर धावगती वाढवण्याच्या प्रयत्नात सिल्वा (८) माघारी परतली. अखेरच्या टप्प्यात दिलहारीने नाबाद २५ धावा करून श्रीलंकेला ११३ धावांपर्यंत पोहोचवले. राधा यादवने ४, राजेश्वरी गायकवाडने २ तर शिखा, पूनम आणि दिप्तीने १-१ बळी टिपला.

११४ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना अनुभवी सलामीवीर स्मृती मानधना हिने दमदार सुरूवात केली होती, पण फटकेबाजीच्या प्रयत्नात स्मृती माघारी परतली. तिने ३ चौकारांसह १२ चेंडूत १७ धावा केल्या. फॉर्मशी झगडत असलेली भारतीय कर्णधार हरमनप्रीत पुन्हा अपयशी ठरली. १५ धावांची खेळी केल्यावर ती उंच फचका मारून झेलबाद झाली. शफालीदेखील ४७ धावांवर माघारी परतली. त्यानंतर रॉड्रीग्ज (१५*) आणि दिप्ती शर्मा (१५*) यांनी भारताला विजय मिळवून दिला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 29, 2020 1:14 pm

Web Title: shafali verma unlucky as she misses half century once again in t20 world cup 2020 ind vs sl match vjb 91
Next Stories
1 Video : कुस्तीचं मैदान गाजवणाऱ्या आळंदीच्या ‘गुंड’ मुलीची कहाणी
2 आशिया चषकाच्या यजमानपदाचा सावळागोंधळ सुरुच; PCB प्रमुख म्हणतात…
3 श्रीलंकेची खराब फलंदाजी; पण कर्णधार अटापटूचा विक्रम
Just Now!
X