‘पदक मिळवा आणि नोकरी घेऊन जा’, हा हरयाणाचा क्रीडामंत्र. पदकविजेत्या खेळाडूंना कोटय़वधी रुपयांचे इनाम आणि उच्चपदस्थ सरकारी नोकऱ्या देणाऱ्या हरयाणा सरकारने या क्रीडाधोरणामुळे देशासमोर नवा आदर्श ठेवला. मात्र आंतरराष्ट्रीय स्तरावर हॉकीचे मैदान गाजवूनही शाहबाद हॉकी अकादमीच्या रणरागिणींच्या पदरी मात्र कायम निराशा पडत आहे. देशाला जवळपास ५०च्या आसपास आंतरराष्ट्रीय हॉकीपटू देणाऱ्या शाहबाद हॉकी अकादमीच्या एका खेळाडूचा अपवाद वगळला तर बाकीच्या सर्व उपेक्षितच ठरल्या आहेत. लहानपणापासून अथक परिश्रम करून घरातील दारिद्रय़ संपवण्यासाठी आता या देशाचे नाव उज्ज्वल करू पाहणाऱ्या हॉकीपटूंना आता नोकरीची साथ हवी आहे.
देशातील महिला हॉकीला नवी झळाळी देण्याचे काम शाहबाद हॉकी अकादमीच्या रणरागिणींनी केले. पण अर्जुन पुरस्कार विजेत्या सुरिंदर कौरची हरयाणा सरकारची नोकरी वगळली तर बाकीच्या अन्य खेळाडूंना रेल्वेने सहारा दिला आहे. अकादमीत सराव करणाऱ्या बहुतांश मुली या गरीब कुटुंबातल्या. दोन वेळचे अन्न पदरी पडणे, हीच त्यांच्यासाठी समाधानाची बाब. अशा प्रतिकूल परिस्थितीवर मात करून आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत झेप घेणाऱ्या या खेळाडूंना आता घरची आर्थिक जबाबदारी खुणावू लागली आहे. ‘‘जर्मनीत झालेल्या ज्युनियर विश्वचषक हॉकी स्पर्धेत भारताला ऐतिहासिक कांस्यपदक मिळवून दिल्यानंतर आमच्यावर बक्षिसांचा वर्षांव होणे अपेक्षित होते. पण केंद्र सरकार आणि हरयाणा सरकारने केलेल्या मदतीव्यतिरिक्त कुणीही पुढे आले नाही. घरच्यांनी कधीही आमच्याकडे पैशांची मागणी केली नाही. पण आता आमच्यासाठी दिवसरात्र झिजणाऱ्या आई-बाबांच्या हातांना आम्हाला आराम द्यायचा आहे. रेल्वेच्या नोकरीतून मला महिन्याकाठी १२ हजार रुपये मिळतात. पण चांगल्या दर्जाचे आमचे शूज सात हजार रुपयांना मिळतात. बाकीचा इतर खर्चही असतोच. त्यामुळे कुटुंबाची जबाबदारी सरकारने उचलली तर आम्ही खेळावर अधिक लक्ष केंद्रित करू शकू,’’ अशी खंत भारतीय हॉकीपटू राणी रामपाल हिने व्यक्त केली.
तीन वेळा विश्वचषकात भारताचे प्रतिनिधित्व करणारी आणि अर्जुन पुरस्कार विजेती जसजीत कौर हिची परिस्थितीही राणीपेक्षा वेगळी नाही. ‘‘नऊ वर्षे आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचे प्रतिनिधित्व केल्यानंतर आता माझी कारकीर्द संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे. भारताचे इतकी पदके मिळवून दिल्यानंतरही मी नोकरीपासून वंचित आहे. आता तरी सरकारने मला चांगली नोकरी देऊन माझ्या कारकिर्दीला योग्य न्याय द्यावा,’’ अशी इच्छा जसजीतने व्यक्त केली.
शाहबाद हॉकी अकादमीच्या यशात सिंहाचा वाटा म्हणजे द्रोणाचार्य पुरस्कार विजेत्या बलदेव सिंग यांचा. आपली वडिलोपार्जित संपत्ती सोडून संपूर्ण आयुष्य हॉकीसाठी समर्पित करून शाहबादसारख्या छोटय़ाशा खेडेगावात स्थायिक होणाऱ्या बलदेवना अकादमीतून घडणाऱ्या प्रत्येक हॉकीपटूला यशोशिखरावर पोहोचवायचे आहे. ते म्हणतात, ‘‘अकादमीतील जवळपास ९९ टक्के मुलींच्या घरी दारिद्रय़ ठासून भरलेले आहे. मी मुलींना घडवतो, पण भारतातर्फे चमकल्यानंतरही त्यांच्या गुणवत्तेला न्याय मिळत नाही. अकादमीतील प्रत्येक मुलीने देशाचे नाव उज्ज्वल करण्याबरोबरच आपल्या घरचे दारिद्रय़ संपवावी, याच ध्यासापोटी मी पछाडलेला आहे.