शनिवारी रांचीच्या मैदानावर खेळवण्यात येणाऱ्या तिसऱ्या कसोटी सामन्याआधी भारतीय संघाच्या चिंतेत वाढ झाली आहे. संघाचा फिरकीपटू कुलदीप यादवच्या डाव्या खांद्याला दुखापत झाली आहे. रांचीची खेळपट्टी ही फिरकीपटूंना मदत करणारी असल्यामुळे, कुलदीपला भारतीय संघात स्थान मिळणार अशी चर्चा होती. मात्र शुक्रवारी सरावादरम्यान कुलदीप यादवने आपल्या डाव्या खांद्याला दुखत असल्याचं व्यवस्थापनाला कळवलं. यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून शाहबाज नदीमचा भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे.

३० वर्षीय शाहबाद नदीमला भारतीय संघात स्थान मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे. गेल्या काही हंगामामध्ये शाहबाज नदीम स्थानिक क्रिकेट आणि भारत अ संघाकडून चांगली कामगिरी करत आहे. स्थानिक क्रिकेटमध्ये झारखंडकडून खेळणाऱ्या शाहबाज नदीमने ११० प्रथमश्रेणी सामन्यांमध्ये ४२४ बळी घेतले आहेत. त्यामुळे शनिवारी होणाऱ्या सामन्यात अंतिम भारतीय संघात कोणाला संधी मिळते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.