आशिया चषक स्पर्धा ही आता अंतिम टप्प्यात असून आज स्पर्धेच्या विजेतेपदासाठी भारत आणि बांगलादेश यांच्यात झुंज होणार आहे. या स्पर्धेत पारंपरिक प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान यांच्यात दोन वेळा सामने झाले. पण ते सामने जितके रोमांचक व्हायला हवे होते, तितके झाले नाहीत. एका सामन्यात भारत ८ गडी राखून जिंकला आणि दुसऱ्या सामन्यात ९ गडी राखून जिंकला. अफगाणिस्तानच्या संघाने मात्र भारताला चांगलेच झुंजवले आणि सामना बरोबरीत सोडवला. या सर्व थरारात एका स्थानिक सामन्यात भारतीय खेळाडूने केलेली कामगिरी मात्र काहीशी दुर्लक्षित राहिली.

विजय हजारे करंडक स्पर्धेत झारखंडचा फिरकीपटू शहाबाज नदीम याने दुसऱ्यांदा कमालीची कामगिरी केली. गुरुवारी झालेल्या सामन्यात नदीमने केलेल्या कामगिरीच्या जोरावर झारखंड संघाने जम्मू काश्मीरवर ७३ धावांनी मिळवला. नदीमने जम्मू काश्मीरच्या पाच फलंदाजांना तंबूत धाडले.

नदीमने एकूण १० षटके फेकली आणि त्यात त्याने केवळ १७ धावा दिल्या. यापैकी १ षटक निर्धाव टाकण्यातही त्याला यश आले. गेल्याच आठवड्यात राजस्थान विरुद्ध झालेल्या सामन्यात त्याने विश्वविक्रमी कामगिरी केली होती. त्याने १० धावा देऊन तब्बल ८ गडी बाद केले होते. नदीमच्या या कामगिरीच्या बळावर झारखंडने राजस्थानला २८.३ षटकात ७३ धावांत गुंडाळले होते. नदीमने त्या सामन्यात १० पैकी ४ षटके निर्धाव फेकली होती.

नदीमने केलेली कामगिरी ही लिस्ट अ प्रकारातील सर्वोत्तम कामगिरी ठरली होती.