पाकिस्तानचा अष्टपैलू क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय जाहीर केला आहे. आपल्या २१ वर्षांच्या क्रिकेट कारकीर्दीला शाहिदने सोमवारी अलविदा केला. ३६ वर्षीय शाहिदने कसोटीमधून याआधीच २०१० साली निवृत्ती जाहीर केली होती.  तर २०१५ साली विश्वचषक स्पर्धेनंतर शाफ्रिदीने वनडेमधूनही निवृत्ती घेतली. पण देशाच्या ट्वेन्टी-२० संघाचे नेतृत्त्व शाहिद करत होता. २०१६ साली चॅम्पियन्स करंडक स्पर्धत झालेल्या पराभवानंतर शाहिदने कर्णधार पदावरून पायउतार होण्याचा निर्णय जाहीर केला होता.

जोरकस फटकेबाजी आणि अफलातून लेग स्पिनच्या जोरावर आफ्रिदीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली होती. आफ्रिदीची एकदा बॅट लागली की संपूर्ण स्टेडियममध्ये ‘बूम बूम आफ्रिदी’चा जयघोष सुरू व्हायचा. आफ्रिदीने आपल्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर पाकिस्तानच्या संघाला अनेक महत्त्वपूर्ण विजय प्राप्त करून दिले आहेत. १९९६ साली आफ्रिदीने आपल्या दुसऱयाच आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात श्रीलंकेविरोधात ३७ चेंडूत शतक ठोकून विक्रम रचला होता. त्यापुढील तब्बल १७ वर्षांपर्यंत आफ्रिदीचा हा विक्रम कोणी मोडीत काढू शकले नाही. वनडे क्रिकेटमध्ये आफ्रिदीचे पाकिस्तानच्या संघासाठी मोठे योगदान असले तरी कसोटी क्रिकेटमध्ये तो फक्त २७ सामने खेळू शकला. कसोटीमध्ये आफ्रिदीच्या नावावर ११७६ धावा आणि ४८ विकेट्स जमा आहेत. आफ्रिदीची कसोटीमध्ये १५६ धावांची सर्वाधिक वैयक्तिक खेळी आहे. वनडेमधील करिअर पाहाता आफ्रिदीने पाकिस्तानसाठी आजवर तब्बल ३९८ वनडे सामने खेळले असून ८०६४ धावा ठोकल्या आहेत. यात १२४ धावांची वैयक्तिक खेळी आणि ३९५ विकेट्स त्याच्या खात्यात जमा आहेत. ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये आफ्रिदीने ९८ सामने खेळले आहेत. ट्वेन्टी-२० मध्ये आफ्रिदीने ९७ विकेट्स घेतल्या असून १४०५ धावा केल्या आहेत.

वाचा: चाहत्याला अटक केल्याप्रकरणी शाहिद आफ्रिदीचे थेट मोदींना साकडे

शाहिद क्रिकेटच्या मैदानाबाहेर वादग्रस्त विधानांमुळेही चर्चेत राहिला. काही दिवसांपूर्वी शाहिदने काश्मीरमुद्द्यावर आपले मत व्यक्त करून ट्विटरकरांचा रोष ओढावून घेतला होता. भारत-पाकमध्ये काश्मीरच्या मुद्द्यावरून सुरू असलेल्या वादामुळे काश्मिरी जनतेला सहन करावा लागणारा त्रास दुर्देवी असल्याचे मत शाहिद आफ्रिदीने व्यक्त केले होते. शाहिदने सल्ले देण्याची काहीच गरज नसल्याचे सांगत नेटिझन्सने त्याच्यावर टीका केली होती. शाहिद आफ्रिदीचे नाव असलेली पाकिस्तानी जर्सी घातल्याने आसाममधील युवकाला अटक केल्याचेही प्रकरण पुढे आले होते. याची खुद्द शाहिदने दखल घेऊन झालेल्या प्रकरणावर आपली नाराजी व्यक्त केली होती. याबाबत मोदींना पत्र लिहून विनंती करणार असल्याचेही शाहिदने सांगितले होते.