पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदी याला करोनाची लागण झाल्याची माहिती स्वत: शाहिद आफ्रिदीने दिली होती. यासंदर्भात १२ जूनला एक ट्विट करत त्याच्या करोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह असल्याचे सांगितले होते. “मला गुरुवारपासून बरं वाटतं नव्हतं. अंगदुखीचा प्रचंड त्रास होत होता. मी त्यानंतर करोना चाचणी केली आणि दुर्देवाने चाचणीचा निकाल पॉझिटिव्ह आला आहे. माझ्या प्रकृतीमध्ये सुधारणा होण्यासाठी तुम्ही सर्वांनी प्रार्थना करा,” असे आफ्रिदीने ट्विटमध्ये म्हटले होते. त्यानंतर आफ्रिदीची पत्नी आणि दोन मुली यांचीही करोना चाचणी करण्यात आली.

आफ्रिदीची पत्नी आणि दोन मुली अक्सा आणि अंशा यांचीही करोना चाचणी करण्यात आली होती. त्यातील पहिल्या चाचणीत त्या तिघीही करोना पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले. त्यानंतर पुन्हा एकदा केलेल्या चाचणीत मात्र पत्नी आणि दोन्ही मुलींचा करोना चाचणी अहवाल अखेर निगेटिव्ह आला. “माझी पत्नी आणि दोन्ही मुली, अक्सा आणि अंशा यांची करोनाची पुनर्चाचणी करण्यात आली. आधी त्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते, पण पुनर्चाचणीत मात्र त्यांचे अहवाल निगेटिव्ह आले. त्या तिघी आता करोनामुक्त झाल्या आहेत”, अशी माहिती आफ्रिदीने दिली.

मागील काही काळापासून भारतविरोधी आणि वादग्रस्त वक्तव्यांमुळे आफ्रिदी कायमच चर्चेत होता. त्याने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दलही टीकात्मक भाष्य केले. त्यामुळे आफ्रिदीला करोना झाल्यानंतर अनेक भारतीय क्रिकेटप्रेमींनी त्याच्याबाबत नकारात्मक कमेंट केल्या होत्या. पण हा प्रकार भारताचा माजी क्रिकेटपटू आणि समालोचक आकाश चोप्रा याला अजिबातच रूचला नव्हता.

२१ वर्षांच्या समृद्ध अशा क्रिकेट कारकीर्दीनंतर २०१७ साली फेब्रुवारी महिन्यामध्ये आफ्रिदीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारली. २०१४ मध्ये त्याने शाहिद आफ्रिदी फाऊंडेशन या सामाजिक संस्थेची निर्मिती केली. देशातील नागरिकांचे आरोग्य सुधारणे आणि गरीब-गरजुंना शिक्षण देण्याचे कार्य करणे अशा समाजोपयोगी गोष्टी या संस्थेमार्फत केल्या जातात. ‘युनिसेफ’प्रमाणेच अनेक जागतिक संस्थांच्या पोलिओ उपक्रमात आफ्रिदीचा सहभाग आहे. करोनाचा प्रादुर्भाव पाकिस्तानात वाढल्यानंतर आफ्रिदीने मोठ्या प्रमाणावर तेथील लोकांची सेवा केली.