पाकिस्तानचा माजी अष्टपैलू खेळाडू शाहिद आफ्रिदी हा गोलंदाजीदरम्यान विकेट मिळवल्यानंतर आपल्या खास शैलीत सेलिब्रेशन करण्यासाठी ओळखला जातो. सध्या शाहिद आफ्रिदी दुबईत सुरु असलेल्या पाकिस्तान सुपर लिग स्पर्धेत खेळतो आहे. कराची किंग या संघाचं प्रतिनिधीत्व करताना एका सामन्यात शाहिद आफ्रिदीला विकेट घेतल्यानंतर आपल्यापेक्षा ज्युनिअर खेळाडूची माफी मागावी लागली आहे.

१० मार्च रोजी झालेल्या कराची किंग विरुद्ध मुलतान सुलतान्स संघाच्या सामन्यात, शाहिद आफ्रिदीने मुलतान संघाच्या सैफ बदरला त्रिफळाचीत केलं. यानंतर आफ्रिदीने आपल्या नेहमीच्या शैलीत पॅव्हेलियनच्या दिशेने बोट करत सैफला परत जायला सांगितलं. आफ्रिदीच्या या सेलिब्रेशनमुळे काहीसा नाराज झालेला सैफ काहीकाळ मैदानात तसाच उभा होता.

मात्र या प्रसंगानंतर सैफने आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन, शाहिद आफ्रिदीला एक प्रेमळ संदेश देत आपण हे प्रकरण विसरल्याचं सांगितलं.

ज्यावर प्रतिक्रीया देताना शाहिदनेही सैफची माफी मागत, आपली ती कृती ही उत्साहाच्या भरात झाल्याचं सांगत आपण ज्युनिअर खेळाडूंना नेहमी प्रोत्साहन देत असल्याचं आफ्रिदी म्हणाला.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्विकारल्यानंतरही शाहिद आफ्रिदीचा पाकिस्तान सुपर लीग स्पर्धेतला फॉर्म हा वाखणण्याजोगा आहे. आतापर्यंत खेळलेल्या ६ डावांमध्ये शाहिदने गोलंदाजीत १० बळी घेतले आहेत. फलंदाजीत आफ्रिदीच्या खात्यात १२६ धावा जमाा आहेत.