पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सलमान बटने आपल्याच संघातील सहकारी शाहिद आफ्रिदीवर मोठा आरोप केला आहे. आफ्रिदीने आपली पुनरागमनाची संधी हिरावून घेतल्याचं बटने म्हटलं आहे. 2010 साली झालेल्या स्पॉट फिक्सींग प्रकरणात सलमान बटला 5 वर्षांच्या बंदीची शिक्षा सुनावण्यात आली होती. 2016 साली भारतात होणाऱ्या टी-20 विश्वचषकासाठी सलमानला पाक संघात पुनरागमन करण्याची संधी होती. यासाठी आपण स्थानिक क्रिकेटमध्ये खेळण्यास सुरुवातही केली होती, मात्र 2015 साली माझ्यावरची बंदी उठल्यानंतरही आफ्रिदीने माझी निवड होऊ दिली नाही. सलमान बट GTV News वाहिनीशी बोलत होता.

“NCA मधून मला मुख्य प्रशिक्षक वकार युनूस आणि फलंदाजी प्रशिक्षक ग्रँट फ्लॉवर यांचा फोन आला. त्यांनी मला नेट्समध्ये नेलं आणि काहीकाळ माझ्याकडून सराव करुन घेतला. यानंतर वकारभाई मला म्हणाले, पाकिस्तानकडून पुन्हा खेळण्यासाठी सज्ज आहेस का? यावर मी लगेच हो म्हणालो. यानंतर संघात माझ्या पुनरागमन जवळपास नक्की झालं होतं, मात्र शाहिद आफ्रिदीने असं होऊ दिलं नाही. त्याने नेमकं असं का केलं असावं हे मला माहिती नाही. मी आफ्रिदीला याबद्दल विचारायलाही गेलो नाही. मात्र मला इतकं नक्की माहिती आहे की प्रशिक्षकांनी मला संघात घेण्याबद्दल सकारात्मकता दर्शवली होती, ज्यामध्ये आफ्रिदीने मोडता घातला.” बटने आपल्या भावना व्यक्त केल्या.

2016 साली झालेल्या स्पर्धेत पाकिस्तानच्या संघाची कामगिरी अतिशय खराब झाली होती. यानंतर प्रशिक्षक वकार युनूस आणि कर्णधार शाहिद आफ्रिदी यांना राजीनामा द्यायला लागला होता. मात्र कोण्या एका खेळाडूकडून एखाद्या खेळाडूच्या पुनरागमनाबद्दलचे निर्णय घेतले जाणं योग्य नाही, असं मत सलमान बटने व्यक्त केली. स्थानिक क्रिकेटमध्ये धावा काढूनही माझी संघात निवड होत नसल्यामुळे माझ्यावर अन्याय झाल्याची भावना माझ्या मनात कायम राहिल असंही बट म्हणाला.