पाकिस्तान संघाचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीने आपल्या आत्मचरित्रामध्ये भारताचा माजी क्रिकेटपटू आणि सलामीचा फलंदाज गौतम गंभीरवर टीका केली. ‘गंभीरकडे व्यक्तीमत्व नाही. तो खूप अहंकारी आहे’, अशा शब्दात आफ्रिदीने आपल्या ‘गेम चेंजर’ या आत्मचरित्रामध्ये गंभीरच्या स्वभावावर ताशेरे ओढले. गंभीर स्वत:ला डॉन ब्रॅडमन आणि जेम्स बॉन्ड यांचा मिलाफ असलेलं व्यक्तिमत्व समजतो, असेही त्याने पुस्तकात लिहीले.

या टीकेला गंभीरनेही सडेतोड उत्तर दिले. ‘आफ्रिदी, तू केलेली टीका ही खूपच हास्यास्पद आहे. असो! आम्ही (भारत) अजूनही पाकिस्तानी नागरीकांना वैद्यकीय उपचारांसाठी लागणारा व्हिसा मंजूर करणे बंद केलेले नाही. (तू भारतात उपचारासाठी ये) मी स्वतः तुला मानसोपचार तज्ज्ञाकडे घेऊन जाईन’, असे गंभीरने ट्विट केले आहे.

या मुद्द्यावर पाकिस्तानचा माजी खेळाडू वकार युनिस याने सडेतोड मत व्यक्त केलं आहे. “गौतम गंभीर आणि शाहिद आफ्रिदी यांच्यातील वाद गेल्या काही काळापासून सुरू आहे. मला वाटतं की त्या दोघांनीही आता तारतम्य बाळगलं पाहिजे. त्यांनी आता हुशार, समंजस आणि शांत व्हायला हवं. हा वाद बरेच दिवस चालला आहे. माझा त्यांना सल्ला आहे की जर त्यांना शांत होता येत नसेल, तर जगभरात कुठेही एकमेकांना भेटावं आणि हा वाद एकदाचा मिटवून टाकावा किंवा त्याचा सोक्षमोक्ष लावून टाकावा”, अशी तंबी वकार युनिसने दोघांना दिली.

गंभीरशी आफ्रिदीचा एका सामन्यादरम्यान वाद झाला होता. त्यानंतर या दोघांमध्ये कायमचे वितुष्ट आले. या प्रकाराबाबत आत्मचरित्रात आफ्रिदीने लिहिले होते. ‘काही जणांशी खाजगी शत्रूत्व असतं तर काही जणांशी कामासंदर्भात… मात्र गंभीरबद्दल वेगळचं होतं. गंभीर एकदमच विचित्र आहे. गंभीर आणि त्याचा अहंकार याबाबत मी काय बोलणार? गंभीरकडे व्यक्तिमत्व अजिबातच नाही. याउलट त्याच्या नावावर विक्रम कमी आणि वादच अधिक आहेत. त्याला स्वत:चा खूप अहंकार आहे!’, असे त्याने नमूद केले होते.