पाकिस्तानचा अष्टपैलू खेळाडू शाहिद आफ्रिदी याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होण्याचे संकेत दिले आहेत. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाकडून (पीसीबी) शाहिदला मोठ्या थाटात अलविदा करण्याचे ठरवले आहे. यासाठी शाहिद आफ्रिदी आणि पीसीबीमध्ये करार झाल्याची चर्चा आहे. आफ्रिदीने कराचीत प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना म्हटले की, मला थाटात अलविदा करण्यात यावे, यासाठी मी पीसीबीवर कोणताही दबाव आणलेला नाही. मात्र, एखाद्या खेळाडूला निवृत्त होताना सन्मानपूर्वक वागणूक मिळाली पाहिजे, ही बाब लक्षात घेणे गरजेचे आहे. याबाबात मी इंझमाम-उल-हकशी चर्चा केल्याचेही आफ्रिदीने सांगितले.
एखाद्या खेळाडूला सन्मानपूर्वक निरोप देण्याची पद्धत पाकिस्तानमध्ये नाही, हे मी अनेकदा पाहिले आहे. प्रत्येक खेळाडुची अशाप्रकारे अत्युच्च क्षणी निवृत्त होण्याची इच्छा असते आणि मी त्याला अपवाद नाही, असे यावेळी आफ्रिदीने म्हटले.
गेल्या काही दिवसांपासून शाहिद आफ्रिदीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून स्वत:हून निवृत्ती जाहीर करावी यासाठी पाकिस्तान क्रिकेट मंडळाने (पीसीबी) हालचाली सुरू केल्या होत्या. पुढील महिन्यात संयुक्त अरब अमिराती येथे वेस्ट इंडिजविरुद्धच्या ट्वेन्टी-२० मालिकेसाठी आफ्रिदीची संघात निवड करण्यात आली आहे आणि या मालिकेदरम्यान तो निवृत्ती जाहीर करील, अशी पीसीबीला अपेक्षा आहे.
‘दैनिक जंग’च्या वृत्तानुसार आफ्रिदीने स्वत:हून निवृत्ती जाहीर करावी, अशी पीसीबीची इच्छा आहे.  वेस्ट इंडिजविरुद्धच्या ट्वेन्टी-२० मालिकेनंतर पाकिस्तान पुढील वर्षी एप्रिल महिन्यापर्यंत एकही ट्वेन्टी-२० मालिका खेळणार नाही. त्यामुळे त्यांनी हा निष्कर्ष काढला आहे. आगामी ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेनंतर मानाने निवृत्त व्हावे, अशी आफ्रिदीची इच्छा होती. मात्र, पीसीबीला आगामी ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी संघबांधणी करायची आहे. नव्या दमाच्या ट्वेन्टी-२० संघात आफ्रिदीला स्थान मिळणे अवघड आहे. त्यामुळे वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेसाठी संघात स्थान देण्याचा प्रस्ताव त्याला देण्यात आला असल्याचे सूत्रांनी सांगितले.