आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेला पाकिस्तानी फलंदाज शाहिद अफ्रिदी पाकिस्तान सुपर लीगमध्ये अक्षरक्ष: धुमाकूळ घालत आहे. शाहिद अफ्रिदीने चार चेंडूवर सलग चार षटकार लगावत पाकिस्तान सुप लीगमध्ये आतापर्यंत कोणताही फलंदाज न करु शकलेला रेकॉर्ड केला आहे. शाहिद अफ्रिदीच्या कराची किंग्ज आणि पेशावर जाल्मी यांच्यात हा सामना होता. हा सामना पेशावर जाल्मी संघाने ४४ धावांनी जिंकला. संघाचा पराभव झाला असला तरी शाहिद अफ्रिदीने आपल्या फलंदाजीने प्रेक्षकांची मनं जिंकली.

पेशावर जाल्मी संघाने कराची किंग्जसमोर १८२ धावांचं आव्हान ठेवलं होतं. यावेळी शाहिद अफ्रिदीच्या फलंदाजीने संघाला विजयाचं स्वप्न दाखवलं. अफ्रिदीच्या ताबडतोब फलंदाजीमुळे संघाच्या विजयाच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. यावेळी बाबर आजमनेही चांगली फलंदाजी केली. त्याने ५० चेंडूत ४ षटकार आणि ४ चौकारांच्या मदतीने ६६ धावांची खेळी केली. मात्र या दोघांशिवाय एकही फलंदाज दुहेरी धावसंख्या करु शकला नाही. कराची किंग्ज संघ २० ओव्हर्समध्ये ८ विकेट्स गमावून फक्त १३७ धावा करु शकला.