पाकिस्तानला काश्मीरबाबत काळजी करण्याची गरज नाही. पाकिस्तानकडून चार प्रांत सांभाळले जात नाहीत, त्यामुळे पाकिस्तानने काश्मीरबाबत चिंता करु नये, असे मत पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी अष्टपैलू खेळाडू शाहीद आफ्रिदी याने व्यक्त केले होते. यावर आफ्रिदीने असे विधान करणे टाळायला हवे होते, असे मत पाकिस्तानचा माजी कर्णधार जावेद मियाँदाद याने व्यक्त केले आहे.

सोशल मीडियावर आफ्रिदीच्या पत्रकार परिषदेचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. यामध्ये ‘काश्मीर हा काही मुद्दा नाहीये, पाकिस्तानलाही काश्मीर नकोय…त्यांच्याकडून तर तेथील जनताच सांभाळली जात नाही. काश्मीर भारतालाही देऊ नका… मी म्हणतो काश्मीरला स्वतंत्र राहु द्या… माणुसकी मोठी गोष्ट आहे. ज्या लोकांचा तेथे मृत्यू होतोय…ते कोणत्याही धर्माचे असोत…माणूस म्हणून दुःख होतं…किमान माणुसकी तरी जिवंत राहु द्या’ असं बोलताना आफ्रिदी दिसत आहे. ‘शाहीद आफ्रिदी फाउंडेशन’शी निगडीत एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आला असता इंग्लंडमध्ये एका कार्यक्रमात काश्मीर प्रश्नाबाबत त्याने हे विधान केल्याची माहिती आहे.

यावर माजी कर्णधार मियाँदाद म्हणाला की आफ्रिदीने जे काही विधान केले आहे, ते किंवा त्या पद्धतीचे विधान त्याला शोभत नाही. त्याने अशी विधानं करणे टाळले पाहिजे. संवेदनशील आणि राजकीय विषयावर क्रिकेटपटूने भाष्य करणे हेच योग्य आहे. क्रिकेटपटूंनी निवृत्त होईपर्यंत क्रिकेटवर आपले लक्ष केंद्रित करावे आणि त्यानंतर आपल्याला जमेल असा करियरचा नवा पर्याय निवडावा, असे मियाँदाद यांनी सुचवले.

दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानचा क्रिकेटपटू शाहीद आफ्रिदी याचे म्हणणे योग्यच असल्याचे म्हटले होते.