वेस्ट इंडिजचा धडाकेबाद फलंदाज ख्रिस गेलने बांगलादेशविरुद्ध झालेल्या एकदिवसीय मालिकेत एका नव्या विक्रमाला गवसणी घातली. वेस्ट इंडिजला या तीन सामन्यांच्या मालिकेत 2-1 असा पराभव पत्करावा लागला असला तरी तिसऱ्या सामन्यात तडाखेबाज फलंदाज ख्रिस गेलने एका विक्रमाशी बरोबरी केली. गेलने 66 चेंडूंत 6 चौकार आणि 5 षटकार खेचून 73 धावांची खेळी केली. परंतु अन्य फलंदाजांकडून त्याला योग्य ती साथ लाभली नाही आणि वेस्ट इंडिजचा पराभव झाला.

पण, या सामन्यात गेलने पाचवा षटकार खेचताच एक विक्रम नोंदवला. कसोटी, वन डे आणि टी-20 अशा सर्व प्रकारच्या क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार खेचण्याच्या विक्रमाशी त्याने बरोबरी केली. पाकिस्तानचा माजी खेळाडू शाहिद आफ्रिदीच्या 476 षटकारांच्या विक्रमाशी गेलने बरोबरी केली. आफ्रिदीने तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये एकूण 524 सामन्यांत 476 षटकार खेचले. गेलला हा विक्रम करण्यासाठी 443 सामने खेळावे लागले.

या विक्रमाबाबत गेलला पत्रकारांनी विचारलं असता त्याने आनंद व्यक्त केला. ‘शाहिद आफ्रिदी आणि मी आम्ही दोघंही एंटरटेनर क्रिकेटपटू आहोत.आफ्रिदीच्या विक्रमाची बरोबरी केल्याचा नक्कीच आनंद आहे. पण बूम-बूमला घाबरायचं कारण नाही कारण त्याचा विक्रम अजून अबाधित आहे ‘. असं गेल म्हणाला. मी आता अजून षटकार मारणार नाही असंही गेल हसत-हसत म्हणाला. गेलचं हे विधान क्रीडा पत्रकार सज सादिक यांनी ट्विट केलं. त्यानंतर आफ्रिदीनेही त्यावर उत्तर दिलं आणि ‘युनिव्हर्सल बॉसकडून विक्रम तुटत असेल तर काळजी वाटण्याचं कारण नाही, कारण तो तुझा हक्क आहे. कधीतरी तुझ्यासोबत सिंगल विकेट मॅच खेळायला आवडेल, तेव्हा बघुया कोण जास्त षटकार मारतं, पण त्या सामन्यात बाद होण्याचा नियम नको’, असं उपहासात्मक ट्विट आफ्रिदीने केलं.