नवी दिल्ली : तिसऱ्या आशियाई पॅरालिम्पिक आशियाई स्पर्धेसाठी रवाना होणाऱ्या भारतीय संघाला अभिनेता शाहरुख खान यांच्या उपस्थितीत शुभेच्छा देण्यात आल्या.

पॅरालिम्पिक समितीच्या वतीने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये भारतीय संघात २०० खेळाडूंसह ३०० जणांचा समावेश आहे. भारतीय खेळाडू हे प्रामुख्याने जलतरण, बॅडमिंटन, बुद्धिबळ, पॉवरलिफ्टिंग आणि अ‍ॅथलेटिक्सच्या विविध प्रकारांमध्ये सहभागी होणार आहेत. भारताच्या सुवर्णपदकाच्या आशा प्रामुख्याने दीपा मलिक, देवेंद्र झांझरीया, मरिअप्पन थंगावेलू आणि वरुण भाटी यांच्यावर अवलंबून आहेत. २०१६च्या नियमित ऑलिम्पिकमध्ये भारताला एकही सुवर्णपदक मिळवता आले नव्हते. मात्र भारताच्या दिव्यांग खेळाडूंनी भारताला त्यानंतर झालेल्या पॅरालिम्पिकमध्ये दोन सुवर्णपदकांसह चार पदके मिळवून दिली होती.

खेळाडूंना शुभेच्छा देण्यासाठी इथे येण्यातदेखील माझा स्वार्थ आहे. मी तुम्हा दिव्यांग खेळाडूंकडून प्रेरणा घेण्यासाठी इथे आलो आहे. लहानपणी मला दुखापत झाल्यानंतर वर्षभर घरीच बसावे लागले होते. त्यावेळी तर मला वाटले होते, आपण आयुष्यात कधीच खेळू शकणार नाही. मात्र तुमच्यासारख्या खेळाडूंकडे बघून धडधाकट खेळाडूंसह मलादेखील काही करण्याची आस निर्माण होते.

शाहरुख खान, अभिनेता