IPL 2019 : IPL 2019 मधील कोलकाता आणि हैदराबाद यांच्यातील सामन्यात कोलकाताने ६ गडी राखून विजय मिळवला. १८२ धावांचे आव्हान पार करताना आंद्रे रसलने वादळी खेळी करत १९ चेंडूत ४९ धावा केल्या. तसेच नितीश राणाने अर्धशतकी खेळी केली. या खेळींच्या जोरावर KKR ने आपल्या हंगामाची विजयी सुरुवात केली. पण विजयी खेळी करूनही रसलला सामन्यानंतर रडावसं वाटत होतं, अशी माहिती KKR चा सहमालक शाहरुख खान याने दिली.

KKR च्या चाहत्यांनी जेव्हा माझे आणि संघाचे स्वागत केले त्यावेळी मला खूप भरून आलं होतं. मला त्यावेळी रडावंसं देखील वाटलं. त्यानंतर मी मनात पक्कं केलं की मोठे लोकं चारचौघात रडत नाहीत, असे रसलने मला सांगितले. नितीश राणा, शुभमन गिल आणि पूर्ण संघ हा केवळ चाहत्यांसाठी खेळतो. त्यामुळे आम्हाला दिलेल्या पाठिंब्याबाबत धन्यवाद, असे ट्विट शाहरुखने केले आहे.

दरम्यान, वॉर्नरने केलेल्या ८५ धावा आणि विजय शंकरची शेवटच्या टप्प्यातील फटकेबाजी याच्या बळावर SRH ने ३ बाद १८१ धावा केल्या आणि KKR पुढे १८२ धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना ख्रिस लीनने एक उत्तुंग षटकार लगावत चांगली सुरुवात केली होती. मात्र पुढच्या फटक्याच्या वेळी तो झेलबाद झाला. त्याने केवळ ७ धावा केल्या. शाकिब अल हसनच्या गोलंदाजीवर राशिद खानने त्याचा झेल घेतला. अनुभवी फटकेबाज फलंदाज रॉबिन उथप्पा ३५ धावांवर त्रिफळाचीत झाला आणि KKR ला दुसरा धक्का बसला. त्याला सिद्धार्थ कौल याने त्रिफळाचीत करून माघारी धाडले. उथप्पाने २७ चेंडूत ३५ धावा करत ३ चौकार आणि १ षटकार खेचला. रॉबिन उथप्पा पाठोपाठ लगेचच दिनेश कार्तिक बाद झाला. कर्णधारपदाची जबाबदारी असल्यामुळे दिनेश कार्तिककडून संयमी आणि जबाबदारी खेळी पाहायला मिळेल अशी साऱ्यांची अपेक्षा होती. पण तसे झाले नाही. ४ चेंडूत २ धावा करून तो झेलबाद झाला. नितीश राणाने ३५ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. या खेळीत त्याने ६ चौकार आणि २ षटकार फटकावले. सामन्यात १५.२ षटकांचा खेळ झाल्यावर फ्लडलाईट्समधील बिघाडामुळे सामना थांबवण्यात आला होता. पण सामना पुन्हा सुरु करण्यात आला. पण त्यानंतर लगेचच तो पायचीत झाला. त्याला रशीद खानने बाद केले. त्याने ८ चौकार आणि ३ षटकार खेचले.

तत्पूर्वी सामन्यात कोलकाताच्या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. हैदराबाद संघाने प्रथम फलंदाजी करत संयमी सुरुवात केली. सलामीवीर डेव्हिड वॉर्नर आणि जॉनी बेअरस्टो या दोघांनी सहाव्या षटकात संघाला अर्धशतक गाठून दिले. त्यानंतर आंद्रे रसलच्या गोलंदाजीवर वॉर्नरने षटकार लगावला आणि आपले यंदाच्या IPL मधील पहिले अर्धशतक झळकवले. हे त्याचे IPL कारकिर्दीतील ३७ वे अर्धशतक ठरले. वॉर्नर आणि बेअरस्टो यांनी शतकी सलामी दिली, पण त्या भागीदारीनंतर KKR ला अखेर यश मिळाले. पियुष चावल्याच्या गोलंदाजीवर जॉनी बेअरस्टो त्रिफळाचीत झाला. त्याने ३५ चेंडूत ३९ धावा केल्या. त्यात ३ चौकार आणि १ षटकार समाविष्ट होता. वॉर्नरने फटकेबाजी सुरु ठेवली. पण झंझावाती खेळी करणाऱ्या डेव्हिड वॉर्नरचा रॉबिन उथप्पाने अप्रतिम झेल घेतला आणि तो ८५ धावांवर बाद झाला. ५३ चेंडूच्या खेळीत त्याने ९ चौकार आणि ३ षटकार लगावले. पाठोपाठ अनुभवी धोकादायक फलंदाज युसूफ पठाण फारसा प्रभाव पाडू शकला नाही. रसलच्या गोलंदाजीवर तो त्रिफळाचीत झाला आणि SRH ला तिसरा धक्का बसला. त्याने १ धाव केली. विजय शंकरने नाबाद ४० धावा केल्या.