आत्मचरित्राच्या प्रकाशनाप्रसंगी शाहरुख खानची स्तुतिसुमने

मुलींप्रती जेवढा आदर आपण व्यक्त करू तेवढय़ा अधिक यशोगाथा आपल्यासमोर असतील. सानिया मिर्झा ही अशीच एक यशोगाथा. सानिया रॅकेट खेळांची राणी आहे, अशा शब्दांत बॉलीवूड अभिनेता शाहरुख खानने सानिया मिर्झावर कौतुकाचा वर्षांव केला. ‘ऐस अग्न्सेस्ट ऑड्स’ या सानियाच्या आत्मचरित्राच्या प्रकाशन सोहळ्यात शाहरुख बोलत होता.

‘‘महिलांप्रती सर्वाधिक आदर व्यक्त करणे नितांत गरजेचे आहे. महिलांपेक्षा अधिक यशस्वी माणसे या जगात नाहीत. सानिया हे असेच उदाहरण आहे. देशवासियांना अभिमानास्पद वाटेल अशी तिची कारकीर्द आहे. देशभरातल्या असंख्य मुलामुलींना खेळात कारकीर्द घडवावी आणि देशवासियांना अभिमानास्पद कामगिरी करावी असे वाटावे अशी प्रेरणा पी.टी.उषा, मेरी कोम आणि सानिया मिर्झा यांनी दिली आहे,’’ असे शाहरुखने सांगितले.

‘‘आत्मचरित्राच्या प्रकाशनाकरिता शाहरुखसारखा दुसऱ्या माणसाचा विचारच होऊ शकत नाही. शाहरुख, प्रकाशनाला येऊ शकाल का, असे विचारले. त्यांनी तात्काळ होकार भरला. देवाच्या कृपेने मी प्रदीर्घ काळ खेळू शकले आहे. तिरंग्याचे प्रतिनिधित्व करायला मिळणे हा माझ्यासाठी सन्मान आहे,’’ असे सानियाने सांगितले. सानियाचे आत्मचरित्र देशभरातील सर्व प्रमुख पुस्तकांच्या दुकानात उपलब्ध आहे.